तीन वर्षांच्या आश्वासने आणि प्रस्तावांच्या मान्यतेनंतर तळोजा वीज उपकेंद्रातून कळंबोलीच्या उपकेंद्रामध्ये ६ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनी येण्यासाठी अजूनही तीन महिन्यांची प्रतीक्षा वीज ग्राहकांना करावी लागणार आहे. एक एजन्सी या कामासाठी नेमण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे वीज महावितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे. यामुळे कळंबोली नोडला कावळा, कबूतर, पारवे यांच्यापासून वीज गुल होण्याचे धोके टळणार आहेत. या भूमिगत वीज वाहिनीतून प्रवाह सुरळीत सुरू राहिल्यास कळंबोली व रोडपाली नोडमधील नागरिकांना अखंडित वीजप्रवाह मिळणार आहे.
कळंबोली नोडमध्ये सुमारे २२ हजार वीज ग्राहक महिन्याला अडीच कोटी रुपये वीज बिलापोटी भरतात. मात्र खंडित होणारा वीजप्रवाह ही येथील वीज ग्राहकांची मुख्य समस्या आहे. तळोजा येथील उपक्रेंद्रातून येणाऱ्या विजेच्या तारेवर कावळ्याने चोच मारल्याने अनेकदा कळंबोलीचा वीजप्रवाह खंडित होत असल्याने भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव नागरिकांच्या मागणीनंतर महावितरणने प्रकाशगडावर केला होता. कळंबोलीच्या सततच्या वीज गुल होण्यामुळे अनेकदा उपकेंद्रावर नागरिकांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रकाशगडावरून या प्रस्तावाला मान्यता मिळून काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. अखेर ६ किलोमीटरच्या या वीजवाहिनीच्या प्रवासात दोन वीजवाहिन्या भूमिगत होणार आहेत. मात्र यासाठी कळंबोलीकरांना अजूनही तीन महिन्यांच्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा