श्रीमंतांनी महामार्गावर केलेली अस्वच्छता झाडूने साफ करण्याचे कर्तव्य कळंबोली येथील वाहतूक पोलिसांनी सोमवारी बजावले. सायन – पनवेल मार्गावरील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील महामार्गावर मॅकच्या खवय्यांनी टाकलेला खाद्यकचरा पोलिसांनी सोमवारी स्वच्छ केला. वाहतूक पोलिसांच्या या स्वच्छता मोहिमेबद्दल पोलीस दलातून चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र पोलिसांनी स्वत:चे कर्तव्य बजावण्यापेक्षा उच्च मध्यमवर्गीयांनी केलेला कचरा पोलीस स्वच्छ करताहेत, हेच वास्तव सोमवारी पाहायला मिळाले.
कळंबोली वाहतूक विभागाने भाऊबिजेच्या दिवशी बालग्राम आश्रमशाळेत जाऊन अनाथ बहिणींकडून ओवाळणी करून घेतली. या स्तुत्य उपक्रमामुळे या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असताना, याच पोलिसांनी महामार्गावर वाहतूक नियमन करण्याऐवजी श्रीमंतांनी अस्वच्छ केलेला परिसर स्वच्छ करायला हातात झाडू घेतला. पोलिसांची ही गांधीगिरी समाजातील अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेली. मात्र दबक्या आवाजात हा उपक्रम म्हणजे अल्पवेळेत प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेला स्टंट असल्याचे पोलीस दलातच बोलले जात आहे. मात्र हा बनाव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाला जोडून हा उपक्रम घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी सांगितले.
अजून एक प्रश्न कायमचा सोडवा
ज्या ठिकाणी पोलिसांनी सोमवारी झाडू मारला, त्याच रस्त्याला दिवस-रात्र बेकायदा वाहतूक सुरू असते. तेथे या पोलिसांचे जातीने दुर्लक्ष होत आहे. येथे खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स बस, मोटार बेकायदा उभ्या करून प्रवासी वाहतूक सुरू असते. येथील बसचालक आणि इतर मोटारचालक वाहतूक नियमनांना तुडवून येथे गाडय़ा पार्क करतात. पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा विचार न करता येथे बस उभ्या केल्या जातात. येथून थेट द्रुतगती महामार्गावर जाणे सोयीचे असल्याने अनेक जण प्रवासी न मिळाल्यास रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करतात. त्यामुळे येथे अपघाताची भीती कळंबोलीकरांना कायम आहे. अशावेळी बेकायदा वाहतुकीचा हा प्रश्न या कर्तव्यदक्ष पोलिसांनी कायमचा सोडवावा, अशी मागणी समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा