नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे कालिका देवी मंदिर म्हणजे आज खऱ्या अर्थाने श्रीमंत देवस्थान. पूर्वी अगदी झोपडीसारख्या आकारात असणाऱ्या या मंदिराची आज एक एकर जागेत भव्य वास्तु उभी आहे. धार्मिक कामांसोबत मंदिराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला जात आहे. उत्सव काळात होणारी चेंगराचेंगरी लक्षात घेता भाविकांचा खास विमा काढण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच, दागिन्यांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा उतरविण्यात आला आहे. आगामी काळात संस्थान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मिळालेल्या निधीतून भक्त निवासाची उभारणी करणार आहे.
मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या नाशिकचे ग्रामदैवत म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावर वसलेल्या श्री कालिका देवी मंदिराकडे पाहिले जाते. प्राचीन काळात वसलेल्या या मंदिराच्या स्थापनेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, अहिल्याबाई होळकर यांनी १७०५ साली या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्यावेळी मंदिराचे स्वरूप झोपडीवजा देऊळ असेच होते. त्यावेळी मंदिरात श्री कालिका देवीची मूर्ती होती. मात्र साधारणत ७० ते ८० पूर्वी मंदिरात श्री कालिका माते समवेत श्री महालक्ष्मी आणि सरस्वती मातेची स्थापना करण्यात आली. १९५०-५५ च्या दरम्यान, मंदिराची संस्थान म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी विश्वस्त म्हणून कृष्णराव पाटील यांनी काम पाहिले. यानंतर ही जबाबदारी त्यांचे पुत्र गुलाबराव पाटील यांनी स्वीकारली. याच कालावधीत १९७४ मध्ये नाशिकचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने मंदिराच्या जिर्णोध्दाराचा निर्णय घेतला. यासाठी वास्तूविशारद ग. ज. म्हात्रे यांनी मंदिराची रचना विनामूल्य करून दिली होती. १९७४ ते १९७९ या कालावधीत नव्या मंदिराचे काम पूर्णत्वास गेले. मंदिराच्या रचनेचे वैशिष्ठय़े म्हणजे, मंदिराची आखणी जहाजाच्या आकारात करण्यात आली आहे. सुरूवातीला निमुळता मग अष्टकोन सभागृह मोठय़ा स्वरूपातील गाभारा पुन्हा निमुळती. मंदिराच्या शेजारी बारव आहे. तसेच आवारात कालिका बाबांची समाधीही आहे. आवारात छोटेखानी सभागृह बांधण्यात आले आहे. त्या ठिकाणी सत्संग, स्वाध्याय, विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. तसेच आवारात छोटा बगीचा तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचे गुरू परमानंद हंस यांचा पुर्णाकृती पुतळा असून त्याच्या समोर पाण्याचा कारंजा आहे.
ग्रामदैवत तसेच नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रध्दा असल्याने नवरात्रीच्या दरम्यान, परिसरात यात्रोत्सव भरतो.
मंदिरात कालिका देवी, सरस्वती व लक्ष्मी या तीन मूर्ती आहेत. त्यांच्यासाठी विविध प्रकारची २०० तोळ्यांची आभूषणे आहेत. तसेच १५० किलो चांदिचा महिरप खास तयार करण्यात आला आहे. मौल्यवान आभूषणांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने संस्थानने त्यांचा १ कोटीचा विमा उतरविला आहे. शिवाय उत्सव काळा व्यतिरीक्त देवीसाठी ‘इमिटेशन ज्वेलरी’चा वापर करण्यात येतो. संस्थानची वार्षिक उलाढाल ४० लाखांच्या पुढे आहे.
उत्सव काळात जमा होणाऱ्या उत्पन्नाचा वापर सामाजिक कार्यासाठी होत असल्याचे संस्थानचे विश्वस्थ तसेच अध्यक्ष केशव (अण्णा) पाटील यांनी सांगितले. मंदिराकडे ओटीच्या स्वरूपात जमा होणारे धान्य शहरातील अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम यांना दिले जाते. मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १६ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच चार सुरक्षा रक्षकांची नेमणुकही करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी चोरीचा प्रयत्न झाल्यास खास ‘अर्लाम’ची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने संस्थानला २ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा विनियोग भाविकांसाठी भक्त निवास, भोजनालय, स्वच्छतागृह, सभागृह उभारण्यासाठी केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा