नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड बुधवारी करण्यात आली. महासंघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्येही निवड करण्यात आली. हुपरी (ता.हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आवाडे हे संस्थापक अध्यक्ष आहेत. इचलकरंजी शहराला राष्ट्रीय पातळीवरील प्रथमच असा बहुमान मिळाल्याने शहरातील विविध संघटना, संस्था आणि कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आजषबाजी करून निवडीचा आनंद व्यक्त केला.    
देशपातळीवरील साखर कारखान्यांसमोर अडचणी सोडविण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय साखर संघाची स्थापना झाली आहे. १७ डिसेंबर रोजी नवीन संचालक मंडळासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. आज सायंकाळी संचालक मंडळाची बैठक होऊन आवाडे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उपाध्यक्षपदी अमित कोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, जयंतीभाई पटेल, शंकरराव कोले, खासदार प्रभाकर कोरे उपस्थित होते. २२ जणांच्या संचालक मंडळात महाराष्ट्राचे ५ आणि कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, हरियाणा या राज्यांचे प्रतिनिधी आहेत. आवाडे यांनी यापूर्वी महासंघाचे सहा वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या गव्हर्निग कौन्सिलवर ते संचालक आहेत.
चौकट
पवारांचा शब्द खरा. केंद्रीय कृषिमंत्री व या महासंघाचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी महासंघाच्या अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड होईल, असे संकेत दिले होते. आज त्याची पूर्तता झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शरद पवार व आवाडे यांचे सहकार क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ स्नेहाचे संबंध आहेत.