* पूर्व भागाच्या रिमॉडेलिंगची मागणी
* शिवसेना नेते आग्रही
* आयुक्तांचाही सकारात्मक प्रतिसाद
कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या विकासकामांवर कोटय़वधी रुपयांचा रतीब मांडत या दोन्ही स्थानकांचा कायापालट घडवून आणणाऱ्या ठाणे महापालिकेने उशिरा का होईना ठाणे रेल्वे स्थानकातील समस्यांकडे लक्ष देण्याचे निश्चित केले असून येथील समस्यांकडे इतके दिवस डोळेझाक करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाणे रेल्वे स्थानक परिसराचे रिमॉडेलिंग करावे, अशी मागणी लावून धरल्याने मुंब्य्राचा विकास ठाण्याच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अनधिकृत टपऱ्या, हातगाडय़ा आणि फेरीवाल्यांनी व्यापलेल्या मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा ठाणे महापालिकेने गेल्या वर्षभरात अक्षरश: कायापालट घडवून आणला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आनंद परांजपे आणि कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा खासदार-आमदार निधी उपयोगात आणत आयुक्त आर. ए. राजीव यांनी मुंब्रा रेल्वे स्थानक विकास आराखडा एव्हाना पूर्ण करत आणला आहे. त्यामुळे एरवी अक्षरश: बकाल अवस्थेत असलेल्या मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट झाला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत येणारे ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा परिसर अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, हातगाडय़ांनी नेहमीच व्यापलेला असतो. ठाणे रेल्वे स्थानकातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी महापालिकेने या भागात सॅटीससारखा प्रकल्प राबविला. तरीही या भागातील वाहतूक कोंडी फारशी कमी झालेली नाही.
गेल्या काही वर्षांत महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरात जोरदार मोहीम हाती घेऊन या भागातील फेरीवाले तसेच अनधिकृत हातगाडय़ांवर कारवाई केली आहे. मात्र, अजूनही ठाणे रेल्वे स्थानक परिसरात समस्यांचा डोंगर कायम असल्याचे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर मुंब्रा पाठोपाठ आता कळवा रेल्वे स्थानकाचा विकासही झपाटय़ाने होऊ लागल्याने ठाणे स्थानक परिसराचा कायापालट कधी होणार असा सवाल या भागातील प्रवासी उपस्थित करत होते.
ठाणे स्थानक परिसराचाही कायापालट
दरम्यान, कळवा आणि मुंब्रा या दोन्ही स्थानक परिसराच्या विकासाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच्या पदरात पडत असताना ठाण्यात शिवसेनेचे तीन आमदार असूनही या भागाचा विकास का होत नाही, असा सवाल ठाणेकर नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व तसेच पश्चिम भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असताना शिवसेनेचे तीन आमदार या प्रश्नावर फारसे आक्रमक होत नाहीत, असेच चित्र उभे राहिले होते. विशेष म्हणजे, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात कळवा-मुंब्रा परिसराच्या विकासाला प्राधान्य मिळत असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. दरम्यान, कळवा-मुंब््राा स्थानकाचा न्याय ठाण्यालाही लावण्यात यावा, यासाठी शिवसेनेने उशिरा का होईना पुढाकार घेतला असून पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ िशदे यांनी नुकताच आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासह या भागातील पहाणी दौरा केल्याने ठाणेकर प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. घोडबंदर मार्गावरून कोपरीमार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून निमुळत्या मार्गामुळे गर्दीच्या वेळेत या ठिकाणी नेहमीच वाहनांची गर्दी पाहावयास मिळते. त्यामुळे पूर्व भागातील वाहतुकीचे रिमॉडेिलग करण्याचा प्रस्ताव आमदार िशदे यांनी महापालिकेपुढे ठेवला असून राजीव यांनीही या संबंधी काही उपाय सुचविल्याने उशिरा का होईना ठाणे रेल्वे स्थानकाच्या समस्यांकडे लक्ष पुरविली गेल्याची प्रवाशांची भावना आहे. कोपरी पुलापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यत टू टायर वाहतूक सेवा सुरू करण्याचा उपाय राजीव यांनी सुचविला असून ही योजना प्रत्यक्षात कधी अमलात येणार याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
कळवा-मुंब्य्राचा विकास ठाण्याच्या पथ्यावर
* पूर्व भागाच्या रिमॉडेलिंगची मागणी * शिवसेना नेते आग्रही * आयुक्तांचाही सकारात्मक प्रतिसाद कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या विकासकामांवर कोटय़वधी रुपयांचा रतीब मांडत या दोन्ही स्थानकांचा कायापालट घडवून आणणाऱ्या ठाणे महापालिकेने उशिरा का होईना ठाणे रेल्वे स्थानकातील समस्यांकडे लक्ष देण्याचे निश्चित केले असून येथील समस्यांकडे इतके दिवस डोळेझाक करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाणे रेल्वे स्थानक परिसराचे रिमॉडेलिंग करावे,
आणखी वाचा
First published on: 03-04-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalva mumbra development adversely it affacts on thane