जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर आता भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन केले जाणार आहे. उद्या (रविवार) कालवा सल्लागार समितीची बैठक होत असली तरी रब्बीचे पहिले आवर्तन १५ डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून तातडीने बैठक घेण्याचा फार्स सुरू आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडय़ाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने जायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या आदेशामुळे आता जलसंपदा, पोलिस, महावितरण व महसूल विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मंत्रालयातूनच आजपासून पाणी सोडण्याच्या कार्यवाहीचे नियंत्रण सुरू झाले असून नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. संजिवकुमार दयाल यांनीही आज तातडीची बैठक घेतली.
भंडारदरा, मुळा व दारणा या धरणांमधुन आता जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर तीन दिवसांनी आवर्तन केले जाणार आहे. त्यामुळे उद्या बैठकीत निर्णय झाला तरी आवर्तन मात्र २ ते ३ आठवडे लांबणार आहे. तिनही धरणातून एकाच वेळी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतरही जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा झाला नाही तर मात्र पुन्हा एकदा भंडारदऱ्यातून आणखी पाणी सोडण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळेच भंडारदरा, मुळा, दारणा या धरणातून शेतीसाठी सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन नंतर घेतले जाणार आहे. भंडारदरा धरणातून शेतीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी चार तर आमदार भाऊसाहेब कांबळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी तीन आवर्तने सोडावे, अशी मागणी केली आहे. पण सर्व शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे भरणे काढावयाचे असेल तर केवळ दोनच आवर्तने करणे जलसंपदा विभागाला शक्य होणार आहे. दोन आवर्तनात ६० दिवसांचे अंतर असले तर जुनपर्यंत पिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पिकांना थोडा ताण बसणार असला तरी ते पुर्णपणे जळून जाणार नाहीत, उत्पादनात घट येईल. मात्र राजकारणासाठी लोकांचे समाधान व्हावे, त्यांचा उद्रेक होऊ नये म्हणून नेते कागदावर पाण्याचे नियोजन करीत आहेत. वास्तवात उतरणे ते शक्य नाही. त्यामुळे पहिले आवर्तन १५ ते २० डिसेंबरच्या दरम्यान करून नंतर दुसरे आवर्तन १५ ते २० मार्चच्या दरम्यान सोडता येणे शक्य होईल. दोन्ही आवर्तनात सात ते साडेसात टीएमसी पाणी शेतीला देता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा