ठाणे-कळवा या दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या खाडीपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय महापालिकेने जवळजवळ पक्का केला असला तरी त्यासाठी लागणारा सुमारे १८० कोटी रुपयांचा निधी कोठून उभारायचा, असा प्रश्न सध्या महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला पडला आहे.
ठाणे-कळवा, ठाणे-नवी मुंबई या मार्गावर वाहतुकीचा नवा पर्याय या खाडीपुलामुळे उपलब्ध होणार आहे. पुढील तीन वर्षांत या पुलाचे काम पूर्ण व्हावे, असे उद्दिष्ट अभियांत्रिकी विभागाने आखले असले तरी यंदाच्या वर्षांत या कामासाठी जेमतेम १० कोटी रुपयांची कागदावरील तरतूद करण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असला तरी हे काम करताना खारफुटीची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करावी लागणार असल्याने परवानगी मिळविण्याची प्रक्रिया किचकट ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८० ते २०० कोटी रुपयांची रक्कम नेमकी कोठून उभारायची, असा प्रश्न महापालिकेपुढे असून राज्य सरकारकडे त्यासाठी याचना सुरू करण्यात आली आहे.
 ठाण्यातून नवी मुंबई, कोकण, पुणे या दिशेने ठाणे-बेलापूर मार्गावरून जाण्यासाठी सद्य:स्थितीत ठाणे खाडीवर तब्बल १०० वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल अस्तित्वात आहे. वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता याच पुलास लागून आणखी एक दुपदरी पूल १९९५ मध्ये उभारण्यात आला. सद्य:स्थितीत या पुलाचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू आहे.  नवीन कळवा पुलावर दोन्ही बाजूंस मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे खाडीवर कळवा पुलाशेजारी साकेतकडील बाजूस आणखी एक पूल उभारण्याचा प्रकल्प महापालिकेने आखला आहे. या पुलाची आखणीसाठी महापालिकेने एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती.  नवा पूल साकेतकडील बाजूस उभारून पुलाच्या जोडरस्त्यांचा भाग कळवा शिवाजी चौक ते पुढे खारीगांवपर्यंत विकसित करण्याचा प्रकल्प अहवाल अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे.
सोयीचा पूल
नियोजित आराखडय़ानुसार या पुलाची बांधणी झाल्यास कळवा, खारीगांवमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे रस्त्यास नवीन मार्गिका उपलब्ध होऊ शकणार आहे. कळवा-खारेगाव विभागातील विकास आराखडय़ानुसार असलेले अंतर्गत रस्ते प्रस्तावित नवीन रस्त्यास जोडणे शक्य होऊन त्यामुळे या विभागातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सोयीची होईल, असा अभियांत्रिकी विभागाचा दावा आहे.  येत्या आर्थिक वर्षांत पुलाचे काम सुरू करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने आखले असून त्यासाठी पुढील तीन वर्षांचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे.  प्राथमिक सर्वेक्षणानंतर पुलाच्या उभारणीसाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता असली तरी महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर नागरी सुविधांवर होणारा खर्च लक्षात घेता हे १८० कोटी कोठून उभारायचे, असा प्रश्न  आहे.  ठाणे महापालिका क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पुलांच्या कामासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन यापूर्वी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्राधिकरणांनी दिले आहे. ही मदत गृहीत धरून २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प हाती घेतला जाणार असून सरकारने या प्रकल्पासाठी अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही.

Story img Loader