मतदारसंघात विकासकामे किती केली यापेक्षा आमचा जवळचा आणि हक्काचा माणूस बघून मतदारांनी कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात निवडणुकीचे कौल दिले. डोंबिवली, कल्याण पश्चिम मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमधील संघाचा प्रभाव आणि भाजपच्या एकगठ्ठा मतांमुळे डोंबिवलीतील भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण, कल्याण पश्चिमेतून नरेंद्र पवार यांना मिळून ते विजयी झाले.
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांची कार्यपद्धतीविषयी पक्षाच्या एका गटात उघड नाराजी होती. ‘आम्ही डोंबिवलीकर’ या साखळीत चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांपासून डोंबिवलीकरांना एका माळेत ओवले आहे. त्यात संघ या निवडणुकीत भाजपच्या बाजूने उतरणार की नाही याविषयी तर्कवितर्क असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यभर प्रचारसभा सुरू झाल्या आणि संघाने निवडणुकीत भाजपच्या बाजूने दक्ष राहण्याचे आदेश दिले. कल्याण पश्चिमेत महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदासाठी पराभूत झालेल्या नरेंद्र पवार यांना मोदी लाटेमुळे आमदारकीची लॉटरी लागली असे म्हणता येईल. पश्चिम भागात भाजप, संघाचा सुप्त जोर आहे. एकदा आदेश निघाल्यानंतर संघ, मोदी लाटेमुळे गुजराती, मारवाडी समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला. मनसेचे आमदार प्रकाश भोईरही निष्प्रभ ठरले. नाराज गटामुळे शिवसेनेचा गड ढासळला आणि भाजपच्या पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची येथे डाळ शिजली नाही. कल्याण ग्रामीणमध्ये रमेश पाटील कुटुंबाविषयी स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेली नाराजी लोकसभेप्रमाणे या वेळी दिसून आली.
जमीनजुमल्याचा वाद लोकसभेत जसा पाटील कुटुंबाला त्रासदायक ठरला, त्याचप्रमाणे विधानसभेतही तीच लाट कायम असल्याचे दिसून आले. दारचा चालेल, पण घरचा नको पद्धतीप्रमाणे या भागातील नागरिकांनी मतदान करून विकासकामे करूनही रमेश पाटील यांचा पराभव केला. शिवसेना आणि ग्रामस्थ अशी अभेद्य युती या भागात पाटील कुटुंबाच्या विरोधात होती.
कल्याण पूर्व भागाचे आमदार असले तरी आमचा मनोरंजनकर्ता असा एक चेहरा गणपत गायकवाड यांनी पूर्व भागातील घराघरांत केबलच्या माध्यमातून पोहोचवला आहे. विकासकामे हा एक भाग नागरिकांसमोर असला तरी मूलभूत गरजांबरोबर गायकवाड केबल ही मुख्य गरज भागवीत असल्याने ते नागरिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे या भागात सेना, राष्ट्रवादीचा प्रभाव असूनही त्यांचा टिकाव येथे लागला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा