टिटवाळा येथील तलावात नौकानयन करण्याचे काम करणारा पालिकेचा ठेकेदार नौकानयनाच्या वेळी कोणतीही सुरक्षा नागरिकांना देऊ शकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेवरून उघडकीला आले असूनही पालिका प्रशासन त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 या नौकानयन ठेकेदारीतून ठेकेदार लाखो रुपये कमवतो. मग त्याने या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुविधा देणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तलावात बोटिंगच्या वेळी सुरक्षेची सर्व साधने, पुरेसा कामगार वर्ग असता तर दोन जणांचे जीव गेले नसते. ठेकेदाराकडून नौकानयनाच्या वेळी योग्य त्या सुविधा नागरिकांना दिल्या जात नाहीत हे अपघातावरून उघड झाले आहे. ठेकेदारावर टिटवाळा पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. असे असताना कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन मात्र ठेकेदाराच्या ठेक्याचा पुनर्विचार करण्याऐवजी त्याची पाठराखण करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका लोकप्रतिनिधीचा समर्थक हा ठेकेदार असल्याने प्रशासन त्याच्यावर कारवाई करीत नसल्याचे बोलले जात आहे.
शहरातील तलावांमधील नौकानयनाचे ठेके स्थानिक मच्छीमार संस्थांना देण्यात यावे, असा सरकारी आदेश आहे. स्थानिकांना तलावाची इत्थंभूत माहिती असते, असा त्यामागील उद्देश असतो. या तलावांमधून मासळी विक्रीच्या माध्यमातून, बोटिंगच्या माध्यमातून पैसे कमवणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून अनेक संस्था सक्रिय आहेत. त्यांना काही लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असतो. त्यामुळे ही मंडळी नागरिकांच्या तक्रारींना दाद देत नसल्याचे बोलले जाते.

Story img Loader