कल्याणजवळील नेवाळी नाका येथे ‘घर घ्या स्वस्त, रहा मस्त’ अशी जाहिरात करून नागरिकांना फसविणाऱ्या पिसवली गावातील ‘बालाजी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सच्या’ दोन विकासकांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या विकासकांनी १४ नागरिकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
कल्याण, पनवेल, ठाणे, उल्हासनगर परिसरांतील हे नागरिक अल्प उत्पन्न गटातील आहेत. बालाजी बिल्डर्सचे भागीदार सुनील पवार (रा. पाम सोसायटी, ए विंग, दुसरा माळा, प्रतीक्षानगर, सायन, मुंबई), मनोज बळीराम धुमाळ (रा. पार्वतीबाई चाळ, शंकरशेठवाडी, वाकोला, सांताक्रुझ पूर्व, मुंबई) यांनी ही फसवणूक केली आहे. श्रीकृपा सोसायटी, मलंग रोड, पिसवली, कल्याण पूर्व येथे या बांधकाम कंपनीचे कार्यालय आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नेवाळी भागातील विमानतळाच्या जागेवर ही घरे बांधण्यात येत होती. नेवाळी ग्रामपंचायत हद्दीतील दिलीप यशवंत नाईक, चित्रा नाईक यांनी ही जमीन विकसित करण्यास दिल्याचे विकासक ग्राहकांना सांगत असत. कमी किमतीत घर मिळत असल्याने तात्काळ विकासकाला आगाऊ रक्कम देऊन ग्राहक घराची नोंदणी केली जात असे. १७ ग्राहकांकडून या दोघांनी पैसे घेतले. नोंदणी केलेले नागरिक घराचा ताबा केव्हा मिळणार, असे विचारत, तेव्हा त्यांना कराराची कागदपत्रे देऊन उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. कळवा येथे राहणारे महेश देवरुखकर यांनी १ लाख ११ हजार रुपयांचा भरणा केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यासह १४ जणांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बिल्डर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आजदे गावातील ‘सक्रिय नागरिक’ चळवळीतील निलेश कर्णे यांची सव्वा लाखांची फसवणूक झाली आहे. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वकर्मा तपास करीत आहेत. दरम्यान, अशी फसवणूक झालेले सुमारे २०० ते ३०० नागरिक असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
बालाजी बिल्डर्सचे घराचे दर
२५० चौरस फुटांचे घर – दोन लाखांत, ३५० चौ. फूट – सव्वा तीन लाख, ४५० चौ. फूट- सव्वा चार लाख.
कल्याणजवळील स्वस्त घरे बिल्डर्सकडून फस्त
कल्याणजवळील नेवाळी नाका येथे ‘घर घ्या स्वस्त, रहा मस्त’ अशी जाहिरात करून नागरिकांना फसविणाऱ्या पिसवली गावातील ‘बालाजी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सच्या’ दोन विकासकांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-08-2013 at 12:58 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan cops arrest builder in fraud case of cheap home sales