उत्पन्नाचे अवाच्या सव्वा उद्दिष्ट आखून बडय़ा बाता मारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढीचे दावे फुसका बार ठरू लागले असून मागील आर्थिक वर्षांत या महापालिकेचे उत्पन्न सुमारे १७० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षभरात एलबीटी, मालमत्ता, पाणीपट्टी यांसारख्या करांच्या माध्यमातून ६३० कोटी ४६ लाख रुपयांचा महसूल वसूल करणे आवश्यक होते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर महापालिकेने प्रत्यक्षात ४६० कोटी ८८ लाखांचा महसूल गोळा केला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे दावे फोल ठरले आहेत.
महापालिकेला स्थानिक संस्था कर (एल.बी.टी) वसुलीत तब्बल ३९ कोटीचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेने ५८६ कोटी ३४ लाखांचा महसूल वसूल केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महापालिकेने १२५ कोटी ४६ लाखाने कमी वसुली केली आहे. गेल्या वर्षी कर विभागाच्या प्रमुख तृप्ती सांडभोर यांनी नियोजन करून मालमत्ता कराची वसुली २०० कोटींच्या घरात पोहचविली होती. मात्र, काही बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे यंदा उत्पन्न घटल्याचे दिसून येत आहे. नगररचना विभागाने गेल्या वर्षांत १३८ कोटी रुपयांची वसुली करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात या विभागाने ८९ कोटी ४७ लाखांची वसुली केली आहे.
कर वसुलीचे उद्दिष्ट
एल.बी.टी विभागामार्फत १८० कोटी वसुलीचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. प्रत्यक्षात १४० कोटी रुपये जमा करणे शक्य झाले आहे. मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट २२६ कोटींचे होते, प्रत्यक्षात १८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. इतर विभागांतील वसुलीचे उद्दिष्ट गाठणेही शक्य झालेले नाही.

Story img Loader