कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली असताना या गेल्या महिनाभरापासून फेरीवाल्यांचा उपद्रव वाढू लागला असून यामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी पुन्हा एकदा खडे फोडू लागले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेला स्कॉयवॉक हा नेहमीच फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. मध्यंतरी येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र ही मोहीम गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याने पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी या भागात बस्तान बसविले आहे.
कल्याणमधील महालक्ष्मी हॉटेल ते शिवाजी चौक रस्ता, दीपक हॉटेल परिसरातील रस्त्यांवर नेहमीच फेरीवाले ठाण मांडून असतात. कल्याण पूर्व भागातही हीच परिस्थिती कायम आहे. डोंबिवलीतील नेहरू रस्ता, कामत मेडिकल पदपथ, पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, राजाजी रस्ता, शिवमार्केट, बाजीप्रभू चौक, मानपाडा रस्ता, केळकर रस्ता, वाहतूक पोलीस कार्यालय, उर्सेकरवाडी भागात फेरीवाल्यांनी तळ ठोकले आहेत. कामत मेडिकलसमोरील फेरीवाल्यांवर मध्यंतरी महापालिकेने कारवाई केली होती. त्यामुळे काही काळ या भागातून फेरीवाले गायब झाले होते. गेल्या महिन्यापासून या भागात पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. कल्याण महापालिकेतील नगरसेवक या विषयावर मूग गिळून आहेत. डोंबिवली पश्चिमेत बाजीराव अहिर यांचे पथक मागील तीन वर्षांपासून फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविताना दिसत आहे. या भागातही फेरीवाल्यांच्या रांगा दिसू लागल्याने बाजीरावांचे पथक गेले कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. इतर भागांच्या तुलनेत येथे फेरीवाले कमी दिसत असले तरी फेरीवाल्याचे समूळ उच्चाटन करणे बाजीरावांनाही जमलेले नाही. महापालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अनिल लाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण फेरीवाला हटाव पथकाचा नियंत्रक नसल्याचे सांगितले. फेरीवाल्यांचे धोरण राबवण्याचे काम माझे आहे. फेरीवाल्यांना हटवणे वगैरे कामे प्रभाग अधिकाऱ्यांची आहेत.
रेल्वे पोलिसांचे आशीर्वाद
रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पुलावर फेरीवाल्यांचे जथ्थे दिसून येतात. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मुंबईहून येणार असले की तेवढय़ा वेळेपुरते रेल्वे पुलावरील फेरीवाल्यांना हटवले जाते. त्या वेळी खास पोलीस अधिकारी उभे करून फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई करण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा