कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रशासनाने सीमेंटचे रस्ते तयार करण्याची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी या भागातील जलवाहिन्या तसेच भूमिगत वाहिन्यांचे जाळे दूर करण्यासाठी आणखी एक ठेकेदार नेमावा लागणार आहे. या कामाच्या निविदा मागील दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने प्रलंबित ठेवल्याने शहरातील सीमेंटच्या रस्त्यांची कामे जागोजागी अडकून पडली आहेत. सीमेंटची कामे पूर्णत्वास जावीत, यासाठी आवश्यक असलेल्या या निविदा लवकर काढाव्यात, अशी मागणी यापूर्वी नगरसेवकांकडून वारंवार केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील सीमेंट रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी स्थायी समितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केली होती. त्या वेळी प्रशासनाने या निविदा लवकरच उघडण्यात येतील, तसेच सीमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन स्थायी समितीत दिले होते. असे असताना दोन महिने उलटले तरी ही कामे करणारा ठेकेदार नेमण्यात महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने नगरसेवकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कामासाठी दोन निविदा आल्या आहेत. प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या निविदेच्या बाबतीत काही तांत्रिका चुका केल्याने त्यावर लेखा, लेखापरीक्षण विभागाने काही हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे ही कामे रेंगाळत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. येत्या आठ दिवसांत या कामाच्या निविदा उघडल्या नाहीत, तर पावसाळ्यापूर्वी सीमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करणे अवघड होणार आहे, असे मनसेचे नगरसेवक हर्षद पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी सीमेंट रस्त्यांसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रस्त्यालगतच्या जलवाहिन्या व अन्य जाळ्या हटविण्याचे काम प्रलंबित असल्याने सीमेंट रस्त्यांची कामे अडकून पडली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. याबाबत प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले, येत्या आठ दिवसांत युटिलिटी टेंडर उघडण्यात येतील. जास्त दराची टेंडर असल्याने दर कमी करण्यास भाग पाडले. काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे या टेंडरला थोडा उशीर झाला.

Story img Loader