सफाई कामगार अधिकाऱ्यांच्या सेवेत
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ८८५ सफाई कामगार तसेच वेगवेगळ्या विविध विभागांमधील शिपाई, मदतनीस, सुरक्षारक्षक काही पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या घरी काम करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महापालिकेकडून मिळणारे भत्ते, सुविधांचा लाभ घ्यायचा आणि सेवा मात्र पदाधिकारी-अधिकाऱ्यांना पुरवायची, असे प्रकार सध्या सुरू आहेत. डोंबिवलीतील एका प्रभाग अधिकाऱ्याची पत्नी ही सफाई कामगार आहे. तिची नियुक्ती ब प्रभागात आहे. तिला घरबसल्या वेतनभत्ते मिळत आहेत. ही महिला कामगार आरोग्य निरीक्षकाकडे काही दिवस काम करत होती, असे सांगितले जाते. अनुकंपा तत्त्वावरील काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती यापूर्वीच वादात सापडली आहे. काही सफाई कामगार प्रत्यक्ष रस्त्यावर काम करण्याऐवजी आरोग्य निरीक्षक तसेच वरिष्ठांची मर्जी संपादन करून सुरक्षारक्षकासारखी कामे करत आहेत. महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या दालनात शिपाई म्हणून काम मिळावे यासाठी बरेच कामगार प्रयत्नशील असतात. हेच कामगार नंतर अधिकाऱ्यांची घरचे किराणा सामान भरणे, मुलांना शाळेत पोहोचविणे आदी कामे करून आपली पदे वाचविण्याचा प्रयत्न करतात, असे सूत्रांनी सांगितले. २०१० मध्ये विविध पक्ष कार्यालयांत, विविध विभागांत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना त्यांच्या मूळ पदावर काम करण्याचे आदेश प्रशासनाने काढले होते. काही काळ हे कामगार रस्त्यावर झाडू मारताना दिसत होते. कालांतराने हेच सफाई कामगार पुन्हा महापालिकेतील वातानुकूलित दालनात दिसत आहेत. विविध विभागांत कार्यरत असणारे हे सफाई कामगार कामगारांसाठी असलेले भत्ते, सुविधांचा पुरेपूर लाभ घेत आहेत. काही सफाई कामगारांचा पगार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातून काढला जात आहे. महापालिकेच्या भांडार विभागाचे साहाय्यक आयुक्त मनोहर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा