कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे वृत्त ‘वृत्तान्त’ (लोकसत्ता)ने मंगळवारी प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाची धावपळ झाली. त्यामुळे दिवसभर या भागातील कचरा सफाईची मोहीम सुरू होती.  शहरातील कचराकुंडय़ा मंगळवारी ओसंडून वाहात होत्या. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका अधिकारी सकाळपासून पावसाची तमा न करता कामाला लागले होते. सफाई कामगार भर पावसात काम करीत होते. सफाई कामगार कोणाच्या घरी काम करतात याविषयी चर्चा दिवसभर महापालिकेत सुरू होती. आरोग्य विभागावर खमकी भूमिका घेणारा उपायुक्त कार्यरत नसल्यामुळे शहर बकाल होत चालल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत होत आहे. अधिकाऱ्याचा दरारा नसल्याने आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार मनमानी कारभार करतात. त्यामुळे शहरात कचरा साठतो. त्यामुळे कचरा सफाई यंत्रणेचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. यासंबंधी वृत्तान्तमधून वृत्त प्रसिद्ध होताच कल्याण-डोंबिवली शहराच्या सफाईचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे.

Story img Loader