कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील वाहतुकीची कोंडी, वाहतुकीच्या पर्यायी साधनांचा तुटवडा त्यामुळे ही दोन्ही शहरे वाहनांनी गजबजून गेली आहेत. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण ते ठाणे शहरापर्यंत (कापूरबावडी)पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच डोंबिवली ग्रामीण भागातील वाहतुकीचा तिढा सोडवण्यासाठी या भागात पनवेल, वसई-दिवा रेल्वे मार्गावर उड्डाण पूल उभारण्यात यावा, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे केल्या आहेत.
कल्याणमधील खडकपाडा, दुर्गाडी, कोन, राजनोली नाका, पिंपळास, माणकोली, ओवळे, भिवंडी वळण रस्ता, दिवा, खारेगाव ते कापूरबावडी या मार्गाचे मेट्रो रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करावे. हा मार्ग सुरू झाला तर कल्याण रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा भार कमी होईल. कल्याणचा नागरिक २५ मिनिटांत ठाणे शहरात पोहोचेल. पर्यायी वाहतूक निर्माण झाल्यामुळे शहरातील वाहनांचे गजबजलेपण कमी होईल. त्यामुळे या मार्गाचे लवकर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे रवी गायकर यांनी ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे केली आहे.
डोंबिवली ग्रामीण भागातून गेलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाण पूल, भुयारी मार्ग नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना आडवळणाचा वळसा घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे मार्ग आहे. वाहने आहेत, पण पर्यायी मार्ग नाहीत. त्यामुळे या गावांचा विकास रखडला आहे. ग्रामीण भागातून वसई-पनवेलकडे गेलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाण पूल, भुयारी मार्ग बांधण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी रोटरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.