कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना महापालिकेचे ३८ नगरसेवक चार अधिकाऱ्यांसोबत गुजरात आणि राजस्थानच्या सहलीला निघाले आहेत. गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू असून या कामांची माहिती करून घेण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीला अभ्यासदौरा असे नाव देण्यात आले असले तरी त्यासाठी सुमारे २० लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
या सहलीसाठी येणाऱ्या २० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हर्षद पाटील यांनी मात्र या दौऱ्याला वरिष्ठांनी मान्यता दिली तरच आम्ही सहभागी होऊ अशी भूमिका मांडली. तसेच पक्षाचे नगरसेवक या दौऱ्यात स्वत:च्या खर्चाने सहभागी होतील, असाही दावा केला. गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये रस्ते, उड्डाणपूल, स्कॉयवॉक अशा प्रकल्पांची कामे उत्तम दर्जाची झाली आहेत, असा प्रशासनाचा दावा आहे. या कामांच्या पाहणीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना शहरात सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचे आव्हान येथील अभियांत्रिकी विभागापुढे आहे. असे असताना गुजरात राज्यातील कोटय़वधी रुपयांची विकासकामे पाहून ती कल्याण-डोंबिवलीत कशी राबवणार, असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी दक्षिण भारत, परदेश, गोवा, गुजरातमध्ये महापौरांसह नगरसेवकांनी दौरे केले आहेत. या राज्यात प्रशिक्षणाच्या नावाने लाखो रुपयांच्या अभ्यासदौऱ्यांची औपचारिकता पार पाडण्यात आली आहे. या दौऱ्यांचा शहराच्या विकासाला काय फायदा झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याणमधील टाइम ट्रॅव्हल्स या ट्रव्हल एजन्सीच्या पुढाकाराने होणाऱ्या दौऱ्यात हवाई प्रवास, निवास, भोजन यासाठी प्रत्येकी ४५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
शिवसेना नेते नाराज
शिवसेनेचे जिल्हा स्तरावरील नेते या दौऱ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. यापूर्वीच्या दौऱ्यांचा कोणताही अहवाल देण्यात आलेला नाही. मग पुन्हा पुन्हा हे दौरे करण्यास प्रशासन मंजुरी देतेच कशी? असा सवाल शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने उपस्थित केला. नेते नाराज असले तरी पक्षाचे नगरसेवक मात्र सहलीला निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा