कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांमधील स्कायवॉकवर फेरीवाले मोठय़ा संख्येने बसत असल्याने नागरिकांना येथील जीन्यांवरून चालणे अवघड झाले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि रेल्वे पोलीस यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा स्कायवॉक फेरीवाल्यांना आंदण दिल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. कल्याण स्थानकाला तर फेरीवाल्यांचा अक्षरश: गराडा पडल्याचे चित्र दिसत असून या स्थानकांमध्ये सरकते जिने बसविण्यासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविषयी साधा ‘ब्र’ उच्चारत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा असल्याने मध्य रेल्वे स्थानकाच्या सर्व रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. असे असताना कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे स्थानकांवर मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे या रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर ४० फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी जागोजागी फेरीवाले बसल्यामुळे प्रवाशांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. रेल्वे स्थानकापासून सॅटिस पुलास जोडणाऱ्या पुलावर दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येत आहे. त्यामुळे सॅटिसवर अक्षरश: फेरीवाला बाजार भरल्यासारखे चित्र नजरेस पडत आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, रेल्वे पोलिसांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबई बाजूकडील जिन्यांवर दररोज १५ फेरीवाले बसलेले असतात. महिला रेल्वे सुरक्षा जवानांचे या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. भाजीविक्रेते, फळविक्रेते रेल्वे स्थानकांची प्रवेशद्वारे अडवून बसलेले असतात. याबाबत रेल्वे पोलिसांनी विचारले असता फेरीवाल्यांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारान्वये कारवाई केली जाते. आम्हाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. पण फेरीवाले डोंबिवली रेल्वे स्थानकात बसले असतील तर त्याची पाहणी करतो असे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा