* रेल्वेचे नियोजित ऊर्जानिर्मिती केंद्र वादात
शिवसेनेच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला वाकुल्या दाखवत ठाणे शहरातील प्रस्तावित रेल्वे टर्मिनस कल्याणच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे बंडखोर खासदार आनंद परांजपे यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी धक्का दिला असून कल्याण परिसरात रेल्वे टर्मिनस उभारण्यासाठी जागाच उपलब्ध नाही, असा पवित्रा रेल्वेने घेतला आहे. ठाणे परिसरातील कोपरी भागात मनोरुग्णालयाच्या जागेवर रेल्वे टर्मिनस उभे राहावे, यासाठी शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. मात्र, हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवणे कठीण जात असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुत्र तसेच कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी कागदावर राहिलेले ठाण्याचे टर्मिनस कल्याणमध्ये व्हावे, अशी मागणी लावून धरली होती. कल्याण लोकसभेतील राजकीय गणिते लक्षात घेता परांजपे यांनी या नियोजित रेल्वे टर्मिनसचा मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याणमध्ये टर्मिनससाठी जागाच नाही, अशी भूमिका घेत सुबोध जैन यांनी परांजपे यांच्यापुढील अडचणी वाढविल्या आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील नागरीकरणाचा आवाका लक्षात घेता या भागात रेल्वे टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे, असा मुद्दा सर्वप्रथम खासदार या नात्याने प्रकाश परांजपे यांनी मांडला. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान कोपरी येथील मनोरुग्णालयालगत रिकाम्या असलेल्या भल्यामोठय़ा भूखंडांवर हे टर्मिनस उभारले जावे, असा परांजपे यांचा प्रयत्न होता. मात्र, या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न काही सुटला नाही आणि गेल्या काही वर्षांत येथील मोकळ्या भूखंडांवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. दरम्यानच्या काळात ठाणे महापालिकेने विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाचा नवा प्रकल्प पुढे आणला. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान हे नवे रेल्वे स्थानक उभारले जावे आणि त्यालगत मोनो-मेट्रो आणि टीएमटी बसगाडय़ांचे एकत्रित आगार उभारावे, अशी या प्रकल्पामागील मूळ कल्पना आहे. मध्य रेल्वेने या विस्तारित रेल्वे स्थानकास हिरवा कंदील दाखविल्याने ठाणे महापालिकेने आता या प्रकल्पाचा अभ्यास करण्यास तज्ज्ञ कंपनीची नेमणूक केली आहे. विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे लक्षात आल्याने खासदार परांजपे यांनी टर्मिनस कल्याणमध्ये व्हावे, अशी मागणी लावून धरली. ठाण्यातील नियोजित रेल्वे टर्मिनस हा शिवसेनेसाठी भावनिक प्रकल्प मानला जात असे. परांजपे यांनी हा प्रकल्प थेट कल्याणच्या दिशेने नेल्याने शिवसेनेत अस्वस्थता होती. दरम्यान, परांजपे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेने कल्याण परिसरात टर्मिनस उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू केला होता. मात्र, कल्याणमध्ये टर्मिनससाठी जागाच नाही, असा निष्कर्ष आता रेल्वे प्रशासनाने काढला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी जागेविषयी नकारघंटा वाजविल्याने सध्या परांजपे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या गोटात अस्वस्थता आहे. कल्याण रेल्वे स्थानकाला सध्या जंक्शनचा दर्जा आहे. त्यामुळे या ठिकाणी टर्मिनस उभारण्यास रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी फारसे उत्सुक नाहीत, असे सांगितले जाते.
कल्याण टर्मिनससाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करणारे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची गुरुवारी सकाळी खासदार आनंद परांजपे यांनी भेट घेतली. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ठाकुर्ली येथे ७०० मेगाव्ॉट क्षमतेचा पॉवर प्लॉन्ट उभारण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. तीन वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा झाली असली तरी या कामाची कोणतीही हालचाल अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे ठाकुर्ली येथे ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर टर्मिनस उभारावे, अशी मागणी परांजपे यांनी जैन यांच्याकडे केली. प्रवाशांना वाहतूक सेवा पुरविणे हे रेल्वेचे आद्यकर्तव्य आहे. ऊर्जानिर्मिती हा दुय्यम भाग असून त्यामुळे ही जागा टर्मिनसकरिता वापरात आणावी, असा आग्रह परांजपे यांनी धरला आहे.