कल्याण ते पाली सुमारे २३० किलोमीटरचे अंतर आणि तेही सायकलवरून पार करत पर्यावरणस्नेही यात्रेची सुरुवात २९ वर्षांपूर्वी कल्याणातील सायकलप्रेमी विलास वैद्य यांनी केली. प्रत्येक वर्षी नावीण्यपूर्ण सायकलचा समावेश आपल्या या यात्रेत करत ही सायकल सफर अधिक शानदार करण्याचा प्रयत्न या मंडळींचा असतो. यंदा चार सायकलस्वार जोडसायकलसह ही मोहीम पूर्ण करून नुकतेच कल्याणात दाखल झाले. थंडी, धुक्याची साथ आणि गणेश जयंतीचा उत्सव ही मंडळी या मोहिमेच्या निमित्ताने अनुभवतात.
पाली हे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध ठिकाण. या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते. अनेक भाविक या यात्रेसाठी जात असले तरी कल्याणमधील विलास वैद्य यांनी या यात्रेला ‘पर्यावरणस्नेही यात्रे’चे स्वरूप दिले. दरवर्षी नवे मित्र आणि नव्या पद्धतीच्या सायकल्स हे या यात्रेचे वेगळे वैशिष्टय़े. त्यांची ही यात्रा सध्या कल्याण-पाली मार्गावर आकर्षणाचा विषय ठरू लागला आहे. सुरुवातीचे काही वर्षे सामान्य सायकलवरून वैद्य आणि त्यांच्या मित्रांचा प्रवास होत होता. त्यामध्ये वेगळेपण आणण्यासाठी २००६ मध्ये त्यांनी जोडसायकलचा पर्याय आपल्या यात्रेत सहभागी केला. दोन जण बसू शकतील या प्रकारची ही सायकल लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरली. रस्त्याने जाणाऱ्यांच्या नजरा या सायकलकडे खिळल्या. पादचारी, गाडीवाले, बस प्रवासी सगळ्यांनी त्यांच्या या सायकलला भरभरून दाद दिली. त्यानंतर प्रत्येक यात्रा वैविध्याने नटू लागली. २०११ साली त्यांनी एक छोटे चाक, तर दुसरे मोठे चाक अशी आगळीवेगळी सायकल तयार करून त्यावरून ही यात्रा पूर्ण केली. तर २०१२ साली तीन सीटची शानदार सफर पूर्ण केली. यंदाच्या या मोहिमेत विलास वैद्य यांच्यासह प्रितम अत्रेकर, रोहन पाटील आणि सुनील मेस्त्री यांनी सहभाग घेतला होता. तर यंदा त्यांच्या यात्रेमध्ये २००६ साली वापरलेल्या सायकलप्रमाणेच जोडसायकलचा समावेश करण्यात आला होता.
सायकल सफारी व्हाव्यात!
सायकल ही रोजच्या वापरातील आणि जीवनातील अविभाज्य घटक व्हावी यासाठी सायकल चालवण्याचा हा उपक्रम विलास वैद्य राबवत असून, त्यांच्याही दैनंदिनी जीवनात सायकलला महत्त्वाचे स्थान आहे. विलास वैद्य सायकल घेऊनच कल्याणहून त्यांचे ठाण्यातील ऑफिस गाठतात, त्यामुळे कंपनीकडून आणि वरिष्ठांकडूनदेखील सन्मानांची वागणूक मिळत असल्याची भावना यानिमित्ताने वैद्य यांनी व्यक्त केली. प्रत्येकांनी अशा प्रकारची सायकल सफर वर्षांतून एकदा तरी करावी, असा सल्लादेखील ते देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा