ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गाला मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या मार्गावरील ताणाचा विचार करून मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे घोषणा केलेल्या ‘कल्याण-वाशी’ या मार्गाला २०१७ पर्यंत तरी मुहूर्त मिळणार नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे अधिकारी मुकेश निगम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या मार्गाचे काम दिवा-ठाणे दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय हाती घेण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम जोरात सुरू आहे. या कामातील ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा ते कल्याण हा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र दिवा ते ठाणे या दरम्यान रेल्वेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थात मुख्य अडचण मधल्या डोंगरांची आहे. हे काम २०१५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता निगम यांनी वर्तवली.
येत्या वर्षभरात दिवा-ठाणे या दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मग कल्याण-वाशी या महत्त्वाकांक्षी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे.
मात्र ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढली आहे. यापैकी अनेक प्रवासी कल्याणच्या दिशेने ठाण्याला उतरून वाशी व पनवेल गाडय़ा पकडतात. ही बाब लक्षात घेऊन कल्याणवरून वाशीला जाणारी गाडी सुरू करणे आवश्यक आहे. मात्र दिवा-ठाणे या दरम्यानचा पाचवा व सहावा मार्ग पूर्ण झाल्याशिवाय या कामाची सुरुवात होणार नाही, असे निगम यांनी स्पष्ट केले.
कसा असेल मार्ग?
‘कल्याण-वाशी’ हा मार्ग मुंब्रा व कळवा या मार्गाने जाणार आहे. या गाडय़ा कळव्यापर्यंत पहिल्या व दुसऱ्या मार्गाने येतील. त्यानंतर हा मार्ग ठाणे-वाशी मार्गाला जोडण्यात येईल. हा मार्ग ठाणे वाशी मार्गावर जोडण्यासाठी हार्बर मार्गावर वांद्रे येथे असलेल्या पुलाप्रमाणे पुल बांधणे आवश्यक आहे किंवा मग रूळांची जोडणी करून ते शक्य होईल, याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. या मार्गावर विटावा, दिघा ही स्थानके उभारण्याबाबतच्या मागण्याही प्रशासनाकडे आल्या आहेत. मात्र हा मार्ग प्रत्यक्षात बनल्याशिवाय या मागण्यांबाबत काहीच विचार होणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा