करमाळय़ात चार दिवस चाललेली श्री कमलाभवानी देवीच्या यात्रेची उत्साही व मंगलमय वातावरणात सांगता झाली. यानिमित्ताने मंदिर परिसरात सुमारे २० हजार भाविकांनी यात्रेत सहभाग घेऊन कमलाभवानी मातेचे दर्शन घेतले.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री कमलाभवानी मातेचे मंदिर सुमारे पन्नास एकर परिसरात असून या मंदिरात एकाच वेळी हेमाडपंती, इस्लामी व दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा तिहेरी संगम आढळतो. अठराव्या शतकाच्या आरंभाच्या काळातील मोगलांचे (नंतर निझामाचे) पराक्रमी सरदार रावरंभा निंबाळकर यांनी हे भव्य व सुबक मंदिर सन १७२७ साली बांधले होते. सोलापूरसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद व बीड आदी पाच जिल्हय़ांच्या सरहद्दीवर असलेले हे भव्य मंदिर तमाम भक्तांचे तथा पर्यटकांचे आकर्षण ठरते.
या मंदिरात कमलाभवानी मातेची यात्रा दरवर्षी भरते. चार दिवसांच्या या यात्रेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वापार पंरपरेने पार पडतात. यात्रेच्या अंतिम दिवशी कमलाभवानी मातेची हत्ती या वाहनावरून मिरवणूक काढण्यात आली. कमलाभवानी मातेच्या छबिन्याची फुलांनी उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. चारही बाजूंनी सुरू असलेले वाद्यांचे गगनभेदी आवाज व आकाशातून होणारी शोभेच्या दारूकामाची नयनमनोहर आतषबाजी यामुळे संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता. हजारो भाविकांनी देवीच्या छबिन्यावर सुमारे एक हजार किलो वजनाचे पुष्पहार अर्पण केले. बरेच पुष्पहार पुणे, शिर्डी, पंढरपूर आदी भागांतून मागविण्यात आले होते.
देवीचा छबिना मार्गस्थ होताच भक्तांनी आपले नवस फेडत हजारो किलो गुळाच्या व तिळाच्या रेवडय़ा छबिन्यावरून उधळल्या. नंतर छबिना खंडेरायाला भेटण्यासाठी खंडोबाच्या माळावर गेला. त्या वेळी छबिन्याचे पूजन मंदिराचे विश्वस्त सोमनाथ चिवटे, डॉ. प्रदीप जाधव-पाटील, राजेंद्र राठोड, विवेक येवले, गुलाबराव बागल यांनी केले. तर पौरोहित्य व उत्सवाचे नियोजन अभिमान पवार, राजेंद्र मोरे, सरपंच फलफले, बाळासाहेब पुराणिक, विजय पुजारी, दादासाहेब पुजारी, श्रीराम फलफले, सुनील फुलारी, तुषार जगताप यांनी केले होते. या वेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा