महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात. यात सोलापूरची श्री रूपाभवानी, माढय़ाची श्री माढेश्वरी, करमाळय़ाची श्री कमलाभवानी या शक्तिपीठांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यापकी करमाळय़ातील श्री कमलाभवानी मंदिराएवढे भव्य व सुबक मंदिर अन्यत्र आढळून येत नाही. दाक्षिणात्य, हेमाडपंती व मोगल स्थापत्य शैलीचा अपूर्व संगम लाभलेल्या या मंदिरात श्री कमलाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. या निमित्ताने राज्यभरातून हजारो भाविक करमाळय़ात येतात.
कमलाभवानीची मुख्य यात्रा काíतक पौर्णिमेनंतर पाच दिवस चालते. पाचही दिवस सिंह, मोर, हत्ती, गरूड आदी वेगवेगळय़ा वाहनांवरून दिवसातून दोन वेळा देवीचा छबीना काढण्यात येतो. मुख्य यात्रेच्या दिवशी मध्यरात्री देवीचा मुख्य छबीना निघतो. हा छबीना मंदिराच्या दक्षिणेस जवळच असलेल्या खंडोबा मंदिरात जातो. त्या वेळी खंडोबाच्या वतीने देवीला मानाचा आहेर केला जातो. हा छबीना रात्रभर वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत सुरू असतो. देवीच्या मुख्य मंदिरासमोर असलेल्या होमकट्टय़ावर नवरात्रात अष्टमीच्या दिवशी रात्री पारंपारिक पद्धतीने होम पेटविला जातो.
ऐतिहासिक मंदिर
कमलाभवानीचे मंदिर हे ऐतिहासिक, अतिशय भव्य-दिव्य आणि आखीव-रेखीव अशा दगडी शिल्पकलेने नटलेले आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला पूर्व व पश्चिम बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मुख्य मंदिराभोवती दुहेरी तटबंदी असून तटबंदीच्या आतून ओवऱ्या बांधलेल्या आहेत. सर्व प्रवेशद्वारांवर भव्य गोपुरे आहेत. दाक्षिणात्य शैलीची ही गोपुरे महाराष्ट्रात पहिल्यांदाच उभारली गेली असावी. या गोपुरांच्या तसेच प्रचंड अशा दीपमाळांमुळे हे मंदिर १०-१५ किलोमीटर अंतरावरून दिसून येते. मंदिराचे मुख्य आवार हे ७५ बाय ६५ फूट लांबीचे आहे. चारही बाजूंनी भव्य ओवऱ्या आहेत. मुख्य मंदिरामध्ये शक्ती पंचायतन आहे. श्री कमलाभवानीची मूर्ती साडेतीन हात उंचीची असून ती काळय़ा पाषाणात घडविलेली आहे. देवीची मूर्ती अष्टभूजा असून या हातांमध्ये त्रिशूल, गदा, तलवार अशी आयुधे असून एका हातामध्ये राक्षसाचे शिर आहे. सिंहासनावर आरूढ झालेली ही महिषासुर मर्दनिी असून तिच्या पायाशी महिषासुर पडलेला आहे. मंदिरावर उंच व नक्षीकामाने नटलेले शिखर असून त्यावर विविध देवता व प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात महादेव, गजानन, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण आदी मंदिरे आहेत. याशिवाय अन्नपूर्णेचे मंदिरही आहे.
मंदिराच्या समोरील बाजूस बगिचा परिसरात निजाम सरदार राजे रावरंभा निबांळकर यांच्या घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत. येथील दगडी रथ, डोला, चबुतरा आदी सुंदर वास्तुशिल्प असलेली बांधकामे प्रदर्शनीय आहेत. जवळच ९६ पायऱ्या असलेले संपूर्ण दगडी ‘हत्ती बारव’ आहे. अष्टकोनी आकाराच्या या विहिरीवर पूर्वी हत्तीची मोट चालत असे. आज देखील या मोटेच्या खुणा येथे आढळून येतात.
करमाळा जहागिरीचे सरदार राजे रावरंभा निबांळकर हे तुळजाभवानीचे भक्त होते. त्यामुळे दर पौर्णिमेला तुळजाभवानीच्या दर्शनाला ते घोडय़ावरून तुळजापूरला जात असत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तुळजाभवानी मातेने भक्ताचा त्रास वाचविण्यासाठी करमाळय़ाला येण्याचे मान्य केले. मात्र तिने राजांना अशी अट घातली, की तू करमाळा येईपर्यंत मागे वळून पाहू नकोस, अन्यथा मी तेथेच अंतर्धान पावेन. राजाने ही अट मान्य केली व राजांच्या पाठीमागे तुळजाभवानी निघाली. करमाळय़ाजवळ राजांनी तुळजाभवानी आपल्या पाठीशी आली की नाही हे अधीर होऊन पाठीमागे वळून पाहिले आणि तुळजाभवानी तेथेच अंतर्धान पावली. जेथे तुळजाभवानी अंतर्धान पावली असे सांगितले जाते, तेथे तुळजाभवानीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. राजे रावरंभा िनबाळकर यांनी जवळच्या टेकडीवरील जुन्या हेमाडपंती मंदिराचा जीर्णोद्धार करून हे कमलाभवानी मातेचे मंदिर बांधले, अशी आख्यायिका सांगितली जाते. अर्थात ही आख्यायिका असली, तरी या मंदिराचे संपूर्ण बांधकाम राजे रावरंभा िनबाळकर व त्यांच्या वंशजांनी केले, हा इतिहास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा