कामोठे शहरात बगिचा, मैदाने नसल्याने उन्हाळी सुटीमधील दिवस मुले दुसऱ्या शहरातील नातेवाईकांकडे घालविणे पसंत करत आहेत. येथील मैदानांचे भूखंड फेरीवाल्यांना आंदण दिल्याने मुलांचे खेळणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून सिडको या शहरात सर्वात जास्त १५ बगिचे बांधणार असल्याचे जाहीर केले. मात्र ५ वर्षांत सिडको येथे एकही बगिचा बांधू शकली नाही. कामोठे शहर हे एकही बगिचा नसलेले शहर आहे. या शहरातील फुटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने उकाडय़ाच्या संध्याकाळी मुलांना किंवा ज्येष्ठांना खेळण्यासाठी किंवा पाय मोकळे करण्यासाठी रस्त्यावरून फिरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
मुलांना खेळण्यासाठी काही महिन्यांअगोदर येथे मैदाने होती. मात्र कामोठे शहर फेरीवालामुक्त करण्याच्या हेतूने पोलीस ठाण्याच्या शेजारील मैदान सिडकोच्या कृपेने फेरीवाल्यांना आंदण देण्यात आले आहे. महिन्याला या मैदानावरील फेरीवाल्यांकडून कोण भाडे घेतो, हे मात्र पोलिसांनाही माहीत नसल्याचे पोलीस सांगतात. मोकळ्या मैदानांमध्ये बांधलेली धार्मिक देवालये हा जटिल विषय बनला आहे. शहरात अशा नऊ ठिकाणी सिडकोच्या बगिच्यांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची माहिती सिडकोने दिली. मैदानांसारखी अवस्था मानसरोवर रेल्वेस्थानकासमोरील रस्त्याची आहे. अचानक येथील फुटपाथवर बसलेले भाजीविक्रेते हे सरकारी यंत्रणा आणि काही स्थानिकांनी आपले उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. कामोठे शहरात लवकरच १५ ठिकाणी बगिच्यांसाठी आरक्षित भूखंडावर कुंपण घालण्याचे काम सिडकोने जे. एम. म्हात्रे इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला सव्वादोन कोटी रुपयांना दिले आहे. आचारसंहितेनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. ज्या बगिच्यांमध्ये ४ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागा आहे. अशा तीन ठिकाणी बगिच्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ६५० चौरस फूट जागेवर विरंगुळा केंद्र करण्याच्या विचारात सिडको होती. मात्र विरंगुळा केंद्रासाठी एवढी मोठी जागा ठेवणे उचित नसल्याने सिडकोने पुन्हा आपला ज्येष्ठांसाठीचा विचार बदलला आहे. यामुळे ज्येष्ठांसाठी होणारे विरंगुळा केंद्र पुन्हा लांबणीवर पडले आहे.
गेल्या वर्षांपासून कामोठे येथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघटना सिडको दरबारी पाठपुरवा करीत आहे. मात्र सिडकोच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोकळ्या भूखंडावर मंदिरांनी मनमुरादपणे केलेले अतिक्रमण सिडकोला चालते मात्र जिवंत ज्येष्ठांसाठी फुटाचा हिशेब सिडको ठेवते सिडकोच्या या धोरणावर शहरातील ज्येष्ठांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बुद्धविहाराच्या दर्शनामुळे कामोठय़ातील धार्मिक स्थळांना अभय
कामोठे शहरात दोन वेळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा एकाच मैदानात झाली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी दोन्ही वेळा सभामंडपाच्या शेजारील बुद्धविहारात जाऊन गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींचे दर्शन घेतले. परंतु ज्या जागेवर हे बुद्धविहार बांधले आहे ती जागा सिडकोच्या मालकीची असल्याने हे बुद्धविहार बेकायदा ठरवून  सिडकोच्या अतिक्रमण विभागाने त्यावर दोनदा कारवाई केली होती. मुख्यमंत्र्यांच्या दर्शनानंतर सिडकोमध्ये या विहाराला अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र या विहाराला मान्यता मिळणार असल्यास कामोठय़ातील मजीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही अधिकृत करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Story img Loader