कामोठे येथील रहिवासी पाणीटंचाईतून आपली दिनचर्या चालवीत असताना सिडकोची जलवाहिनी फोडून तिच्यातून दिवसरात्र पाण्याची राजरोस चोरी होत आहे. सिडकोचे अभियंते यापासून अनभिज्ञ असल्याने ही चोरी रोखणार कोण, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. रहिवाशांनी हिमतीने पाणी चोरी करणाऱ्यांना त्याचा जाब विचारल्यावर ही पाणी चोरी कंत्राटदारांच्या सांगण्यावरून होत असल्याचे उघड झाले आहे. कामोठे येथील रहिवासी पाणीपट्टी वेळीच भरूनही तहानलेले मात्र पाणी चोरटे शिरजोर झाल्याचे चित्र कामोठे येथे उघडय़ा डोळ्यांनी रहिवाशांना रोज पहावे लागते.
कामोठे वसाहतीमधील पाणी प्रश्न गंभीर झाल्याने नागरपूर येथील हिवाळी आधिवेशनात कामोठेकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामोठेच्या पाण्यासाठी सिडकोच्या उपाययोजना सुरू असून लवकरच हा प्रश्न सुटेल असे उत्तर दिले. मात्र कामोठे सेक्टर १८ येथील अहिंसा सोसायटीशेजारील परिसरात सिडकोची गटारामधून जलवाहिनी जाते पाणीचोरांनी गटारांमध्येच या जलवाहिनीला छिद्र पाडून त्यातून व्यवस्थित पाणी चोरी सुरू केली आहे. वसाहतीमधील नागरिक रोज येता जाता गटारातून चोरी होणारी पाणी चोरी पाहतात. वसाहतीमधील पाणी गळती व पाणी चोरी याविषयी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना  पत्ता नसल्याने राजरोस अशा प्रकारच्या पाणी चोरांना कामोठे आंदण असल्याचे मानले जाते. यापूर्वीही याविषयी मनसेचे विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गवस यांनी सिडकोकडे तक्रार केल्यानंतर काही महिन्यांसाठी ही पाणी चोरी बंद होती. परंतु गेल्या महिन्याभरापासून पिण्याचे पाणी पळविण्याचा प्रकार सुरू झाल्याने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या चोरीला अलिखित पािठबा असल्याचा संशय गवस यांनी महामुंबई वृन्तात्तशी बोलताना व्यक्त केला. याबाबत पाणी चोरटय़ांना विचारणा केल्यावर ते थेट स्थानिक कंत्राटदारांची नावे पुढे करून रहिवाशांना गप्प बसायला भाग पाडतात. कामोठे वसाहतीमधील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी ३८ लश लक्ष लिटर पाण्याची गरज असताना येथे ३२ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरुन कामोठेकर हैराण झाले असताना अशा पाणीचोरीवर ठोस उपाय होत नसल्याने कामोठेकरांनी संताप व्यक्त केला आहे. पाणीपट्टी वेळीच भरूनही सिडको एकीकडे अपुरे पाणी देत असताना, पाणी चोरांवर कोणतीच कारवाई न करण्याचा सिडकोच्या पवित्र्याने कामोठे हे पाणी चोरांसाठी पोषक वातावरण निर्माण करणारे ठिकाण बनल्याचे नागरिकांचे मत आहे.  

Story img Loader