शहराचे शिल्पकार म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोला दोन लाख कामोठेवासीयांचा पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही. दर महिन्याला लाखो रुपये खर्च करून येथील रहिवाशांना टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. तहानलेल्या दोन लाख कामोठेवासीयांच्या जीवावर टँकर लॉबी त्यांचे उखळ पांढरे करून घेत आहे. पाणीटंचाईमुळे त्रासलेल्या रहिवाशांनी आता पाण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला असल्याने आगामी काळात पाणी प्रश्न पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील सुमारे साडेसहाशे सोसायाटींमधील दोन लाख रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासलेले आहे. गेल्या एक महिन्यापासून सेक्टर १६ येथील प्रेमअंबर आणि सेक्टर १७ येथील जिजाऊ या दोन्ही गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर जगत आहेत. या दोन्ही सोसायटय़ांमध्ये सुमारे साडेतीनशे रहिवाशी आहेत. ५० लाख रुपयांचे घर खरेदी करूनही त्यामध्ये पाणी येत नसल्याने त्या घराचे घरपण हरवल्याचे येथील महिला सांगतात. दिवाळीच्या सुटय़ांच्या काळातही मुलांना तासभर येणाऱ्या पाण्यामुळे लवकर उठावे लागायचे. प्रेमअंबर सोसायटीमधील रहिवाशी पिण्यासाठी, स्वच्छतागृहातही बंदबाटलीमधील पाणी विकत घेऊन संसारगाडा चालवीत असल्याचे येथील महिला कळकळीने सांगतात. पाण्याच्या अनेक तक्रारी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे येथील रहिवाशांनी दिल्या आहेत. परंतु पाण्याच्या टाकीची जलवाहिनी समांतर रेषेखाली आहे, ही वाहिनी जमिनीवर घेऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. प्रेमअंबरसारखी परिस्थिती कामोठे वसाहतीमधील सर्वच मोठय़ा सोसायटय़ांमधील रहिवाशांची आहे. नोकरी करायची की पाण्यासाठी लढे काढायचे, अशा विवंचनेत हे रहिवाशी अडकले आहेत.
टँकर लॉबीची रोजच दिवाळी
रहिवाशांच्या पाणीटंचाईच्या गर्तेचा फायदा टँकरने पाणी पुरवणाऱ्यांनी घेतल्याचे हे रहिवाशी सांगतात. सिडको कळंबोली व खांदा कॉलनी येथे हे टँकर भरण्याची सोय केली आहे. तेथे एक टँकर पाण्याची किंमत ३५० रुपये आहे. मात्र हाच टँकर सोसायटय़ांमध्ये येताच वाहतूक खर्चासहीत तो काही ठिकाणी १२०० ते १५०० रुपयांना विकला जातो. गेल्या महिन्यात कामोठे येथील मोठय़ा सोसायटय़ांनी दररोज १० ते १५ टँकर या सरासरीने तीनशे ते साडेचारशे टँकर पाण्यासाठी साडेचार लाख ते पावनेसात लाख रुपयांचे पाणी विकत घेतल्याचे येथील रहिवाशी सांगतात. टँकरलॉबीच्या या दिवाळीत काही ठिकाणी सोसायटय़ांच्या गैरव्यवहार करणाऱ्या प्रतिनिधींनी आपले हात ओले केल्याचा आरोप सोसायटय़ांमधील रहिवाशांनी केल्याने सोसायटय़ांमधील कलह वाढले आहेत. सोसायटय़ांच्या उपद्रवी प्रतिनिधींना हाताशी धरून टँकरलॉबीने आपले पितळ उजळण्याच्या धंद्याला सिडकोच्या मौनधोरणाचा पािठबा असल्याचे
बोलले जात आहे. या सर्व गैरकारभाराशी सिडकोने आमचा काही संबंध नसल्याचे याआधीच स्पष्ट
केले आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यासाठी अधिकाऱ्यांकडे इच्छा शक्तीची गरज
सिडकोने खारघर, कळंबोली, कामोठे व खांदेश्वर या वसाहती वसविल्या आहेत. सिडकोने भूखंडांची विक्री करून त्यावर विकासकांना इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे. या वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र कामोठेसारख्या वसाहतीची तहान नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागाच्या पाण्याने भागविली जात आहे. सिडकोने भविष्यातील पिढीचा विचार ठेऊन व्यापारी धोरणाला तिलांजली देत सिडकोच्या मालकीचे धरण उभे करणे आजची गरज बनली आहे. सिडको वसाहतीला लागून ओवेकॅम्प येथे धरण होऊ शकते त्याकडे सिडकोने लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेल येथील मोरबे गावाजवळील पडीक धरणाकडे लोकप्रतिनिधी आणि सरकारामधील विविध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मोरबे धरणाची निर्मिती माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारíकर्दीत झाली. मात्र आज या धरणाला तडे गले आहेत. येथील पाणी वाहून वाया जात आहे. या धरणाची निगा राखल्यास हे धरण पनवेलकरांसहीत सिडको वसाहतींची भविष्याची तहान भागवू शकते. इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी समाज घडविणाऱ्या सर्वानी एकत्रित समन्वयाची गरज आहे.
सिडको वसाहतींमधील गृहनिर्माण सोसायटय़ांच्या प्रतिनिधींनी फेडरेशनच्या बैठकीत सिडकोच्या पाण्याविषयी कधीही समस्या असल्याचे सांगितले नाही. अशा आशयाची मागणी प्रतिनिधींनी फेडरेशनकडे केल्यास सिडको व सहकार प्रशासनाकडे सिडकोच्या मालकीच्या जलस्रोतासाठी फेडरेशन पाठपुरावा करेल.
– बी. आर. म्हात्रे, सहसचिव, नवी मुंबई कॉ-ऑप हाऊसिंग फेडरेशन.

सिडकोने वसविलेल्या वसाहतींची किमान पाण्याची तहान भागविणे गरजेचे आहे. अपुऱ्या पाण्यासाठी याआधीही फेडरेशनच्या माध्यमातून सिडको दरबारी व्यथा मांडली आहे. लवकरच सिडकोने स्वत:च्या मालकीचे धरण उभारावे यासाठी फेडरेशन लेखी पत्रव्यवहार करणार आहे.
मल्लिनाथ गायकवाड , अध्यक्ष , पनवेल उरण तालुका कॉ-ऑप. सोसायटी फेडरेशन.

Story img Loader