बॉलिवूडच्या सुपरस्टारचा हॉलिवूड प्रवेश म्हणून ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघितली जाते आहे त्या ‘द ग्रेट गॅट्सबी’ या हॉलिवूडपटाचा शुभारंभ मे महिन्यात होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार असून स्वत: अमिताभ त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लिओनार्दो दी कॅप्रिओची मुख्य भूमिका असलेल्या ‘द ग्रेट गॅट्सबी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मेयर वोल्फशेमची भूमिका साकारली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक बाझ लेहरमन हा थ्रीडी चित्रपट एफ स्कॉट फिझराल्ड यांच्या अभिजात कादंबरीवर बेतलेला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत जे बदल झाले त्याचा समाजजीवनावर झालेले परिणाम या कादंबरीत टिपले आहेत.
‘द ग्रेट गॅट्सबी’ या चित्रपटात ज्यांनी ज्यांनी काम केले आहे त्या सर्वासाठीच कान्स महोत्सवातील या चित्रपटाचा प्रीमिअर ही अभिमानाची बाब आहे. माझ्यासाठी तर मायदेशात परतण्यासारखे आहे. २१ वर्षांपूर्वी माझा पहिला चित्रपट ‘स्ट्रिक्टली बॉलरूम’ कान्समध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता द ग्रेट गॅट्सबीसाठी कान्सचे दरवाजे उघडले आहेत, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक लेहरमन याने व्यक्त केली. या चित्रपटाबद्दल बोलताना, लेहरमन पुढे म्हणाले, ‘कान्सशी या चित्रपटाचे जोडलेले आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा महोत्सव जिथे होतो तिथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या घरात बसून एफ स्कॉट यांनी ही सुंदर कादंबरी लिहिली होती.’
आठवडय़ाभरापूर्वीच ‘द ग्रेट गॅट्सबी’ हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली होती. त्या चित्रपटाला मिळालेली कान्सची सुरूवात ही अमिताभ यांच्यासह संपूर्ण टीमसाठी आनंदाची ठरली आहे.