स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी दोन हजार किमी प्रवास करून येत असलेली स्केटिंग यात्रा उद्या, शनिवारी नागपुरात दुपारी ४ वाजता खापरी नाक्याजवळ पोहचणार आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा संख्यने उपस्थित राहून यात्रेमध्ये सहभागी झालेल्या युवकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदाचा विचार जनमाणसांपर्यंत पोहचावा या उद्दे्शाने महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी स्केटिंग यात्रा आयोजित करण्यात आली होती. १ जानेवारीला या यात्रेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर जवळपास दोन हजार किमीचा प्रवास करून उद्या ती नागपुरात पोहचणार आहे. महापौर अनिल सोले यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ केला होता. या यात्रेत नागपुरातील विविध स्केटिंग क्लबचे २३ युवक सहभागी झाले आहे. यात्रेदरम्यान तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील विविध भागात विवेकानंदाचा विचार पोहचविण्यासाठी गावागावात सभा घेण्यात आल्या. कर्नाटकमध्ये धर्मपूरमपासून जवळपास ४० किमीचा प्रवास करण्यासाठी कर्नाटक सरकारने तेथील स्थानिक आंदोलनामुळे परवानगी दिली नाही. यात्रेमध्ये जागोजागी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले आहे. आज सकाळी पांढरकवडय़ामध्ये भव्य स्वागत करण्यात आले असून रात्री हिंगणघाटला मुक्काम करणार आहे. उद्या सकाळी हिंगणघाटवरून निघणार असून दुपारी चार वाजेपर्यंत नागपुरात पोहचणार आहे.
हॉटेल प्राईडसमोर ४.३० वाजता स्वागत केले जाईल. छत्रपतीनगर, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, लोखंडी पूल, रेल्वे स्टेशन, मेयो हॉस्पिटल चौक, शहीद चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क मार्गे गांधीबाग उद्यानांमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. महापौर अनिल सोले, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांच्यासह सर्व गटनेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
 सायंकाळी ६ वाजता उद्यानांमध्ये स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर सारिका पेंडसे दिग्दर्शित महानाटय़ होणार आहे. या ठिकाणी यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.  

Story img Loader