कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकी मानून वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उदात्त हेतूने राबवित असलेल्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी’ या  योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न होत आहे, तरी समारंभास उपस्थित राहावे, या उपक्रमातही सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन बँकेचे ज्येष्ठ संचालक व बँकेच्या वाचक चळवळ समन्वय  समितीचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी केले आहे.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा शुभारंभ सोहळा बँकेच्या मुख्य कार्यालयात होणार आहे. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त विनायक रानडे यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कराड अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.   
कराड अर्बन बँक २०१७ साली असलेल्या शताब्दी महोत्सवापर्यंत समाजामध्ये विविध उपक्रमांद्वारे समाजभिमुख कार्य करीत आहे. या पाश्र्वभूमीवर बँक  नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कराड परिसरात राबवत आहे.
कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी नाशिक, ठाणे, पुणे इत्यादी शहरांच्या विविध भागांत ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत शंभर ग्रंथ असलेल्या ग्रंथांची एक पेटी अशा कमीत कमी पाच पेटय़ा एका संस्थेकडून घेऊन त्याची जबाबदारी त्याच संस्थेकडे देऊन त्या संस्थेने त्या पेटय़ा शहराच्या विविध भागात चार महिन्यातून एकदा फिरवायची व ज्या ठिकाणी ती पेटी ठेवली जाईल तेथून त्या भागातील वाचकांना वाचनासाठी पुस्तके मोफत उपलब्ध करून द्यायची अशी योजना आहे.
या योजनेंतर्गत कराड अर्बन बँकेने कराड परिसरातील सर्व नागरिकांसाठी पाच पेटय़ा पुरस्कृत केल्या असून, समाजभूषण पु. पां. गोखले यांचे स्मरणार्थ एक व ‘कराड समग्रदर्शन’ तर्फे एक याशिवाय बँकेचे सभासद मारुतराव काशिनाथ माने यांच्यातर्फे  एक, बँकेचे माजी सेवक पी. आर. जोशी व व्ही. एच. भोसले यांच्या वतीने प्रत्येकी एक, बँकेचे सध्याचे सेवक श्रीरंग गणेश ज्ञानसागर व नेताजी विष्णू जमाले यांच्या वतीने प्रत्येकी एक अशा एकूण १२ पेटय़ा पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. त्याची सर्व जबाबदारी कराड अर्बन बँकेने स्वीकारली आहे. या ग्रंथपेटय़ा कराड शहरातील विविध भागात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पेटय़ांमधील ग्रंथसंपदा मोफत वाचनासाठी उपलब्ध होणार असून, त्यासाठी अनामत म्हणून रुपये ५०० घेतले जाणार आहेत. एका ठिकाणी किमान चार महिने कालावधीसाठी एक पेटी उपलबध असणार आहे. त्यानंतर वाचकांच्या मागणीनुसार ही पेटी फिरवली जाणार आहे.
या समितीमध्ये बँकेच्या कर्ज विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंग ज्ञानसागर, प्रशासन विभागप्रमुख माधव माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक मुकुंद कुलकर्णी, तळभाग शाखेचे शाखा व्यवस्थापक विलास चव्हाण, गुरुवार पेठ शाखा व्यवस्थापिका सविता लातूर यांचा समावेश आहे.
कराड परिसरातील नागरिक व वाचकप्रेमींनी या योजनेचा लाभ घेऊन वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे समन्वयक विद्याधर गोखले यांनी केले आहे.

Story img Loader