देशात मंडल आयोग जाहीर झाल्यानंतर देशभरात उफाळलेल्या असंतोषाच्या वातावरणात विशेषत: तरूण वर्ग आत्महत्येकडे ओढला जात होता. स्वत:ला जाळून घेत होता. हा प्रकार गुजरातमध्ये मोठय़ाप्रमाणात सुरू असतानाच शेजारील महाराष्ट्रात त्याचे लोण येण्यापूर्वीच येथील चौफेर ही संस्था व राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने येथे आयोजित मंडल आयोगावरील चर्चासत्राचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. या चर्चासत्रात त्यांनी मोलाचे विचार मांडले होते.
व्यासपीठावर विविध तसेच परस्पर विरोधी विचारसरणीचे विचारवंत नेते उपस्थित करण्यात संयोजकांना यश आल्याने या राष्ट्रीय ज्वलंत प्रश्नावर खऱ्या अर्थाने ऊहापोह झाला. तत्कालीन आमदार व सध्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चर्चासत्राचे उद्घाटक बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी, थोर विचारवंत यशवंतराव मोहिते, मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार अशा दिग्गज विचारवंत नेत्यांनी या वेळी आपले विचार मांडले.
बाळासाहेब ठाकरे यांनी मानवी जीवन हे दुर्मिळ असल्याचे भान करून  देताना पोटाला जात नसते तरी लोकांनी स्वत:ला जाळून घेण्यापेक्षा राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन देशाचा विकास करण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे असे आवाहन केले. हे चर्चासत्र त्यावेळच्या अतिशय ज्वलंत प्रश्नावर प्रभावी ठरले. त्यातील शिवसेनाप्रमुखांचे विचार निश्चितच परिस्थितीला न्याय्य वळण देणारे असल्याने मोलाचे ठरल्याचे मानले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा