कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१२-१३ मध्ये उद्दिष्टाच्या ११४ टक्के एवढा, २४ कोटी रुपयांचा परिवहन महसूल जमा करून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये सन २०११ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच बरोबर दीड वर्षांपूर्वी हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले. दरम्यान, या कार्यालयाकडून शासकीय तिजोरीत विक्रमी महसूल जमा होत आहे.
गेल्या वर्षांमध्ये या कार्यालयाकडे ११ हजार ४८३ दुचाकी व २ हजार ७३ खाजगी वाहनांची नोंद झाली आहे. तर २३ हजार ९५१ वाहन चालवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. १ कोटी ४५ लाखांचा दंड वसूल झाला असून, वाहनांच्या आकर्षक क्रमांकातून तब्बल ९० लाख तर व्यवसाय करातून ७० लाख ४० हजार रूपये जमा झाले आहेत. असा एकंदर २४ कोटी रुपयांचा महसूल जमा करून दिलेल्या लक्षांकाच्या ११४ टक्के वसुली या कार्यालयाने केली आहे. परिणामी सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल कराड उपप्रादेशिक कार्यालयास कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, समन्वयक निळकंठ पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
सदर कार्यालयाचे कामकाज संगणकावर करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कराड व पाटण तालुक्यातील कारखान्यांच्या वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याबरोबरच शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षित वाहतूक विषयक व्याख्यान आणि नो व्हेइकल डे, कार्यालयात येणाऱ्या वाहनधारक व वाहनचालकांकरिता वाहतुकीचे नियम व उपाययोजनांबाबत चित्रफीत दाखवणे असे उपक्रम या कार्यालयाकडून राबविण्यात येत आहेत. तात्पुरत्या भाडेतत्त्वावरील इमारतीत सध्या कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू असून, या कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या गतीने सुरू आहे.
कराड परिवहन कार्यालय कोल्हापूर विभागात प्रथम
कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१२-१३ मध्ये उद्दिष्टाच्या ११४ टक्के एवढा, २४ कोटी रुपयांचा परिवहन महसूल जमा करून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
First published on: 07-04-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karad rto first in kolhapur division