कराड अर्बन बँकेचे वाचकांप्रती असलेले योगदान मोलाचे असून, बँकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे,असे गौरवोद्गार साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांनी काढले.
कराड अर्बन बँक व नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे समाजामध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी आयोजित ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा प्रारंभ म्हैसकर व मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला; या प्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यावेळी उपस्थित होते.  बँकेच्या वाचक चळवळ समन्वय समितीचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांचीही या वेळी उपस्थिती होती.
सुभाषराव जोशी म्हणाले की, बँकेच्या शताब्दी महोत्सवापर्यंत समाजामध्ये विविध उपक्रमांद्वारे बँक समाजाभिमुख कार्य करीत आहे. बँकेने कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ‘गं्रथ तुमच्या दारी’ ही योजना सध्या कराड परिसरात राबविण्यात येत असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले की, कराड अर्बन बँकेने सतत ग्राहकाभिमुख सेवा देतानाच परिसरातील तसेच समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकांसाठी उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँकेने ‘गं्रथ तुमच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
विनायक रानडे म्हणाले की, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना आम्ही सुरू केली असून, त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. कराड अर्बन बँकेने या योजनेमध्ये चांगल्या पध्दतीने प्रतिसाद नोंदवून या योजनेला दिलेले पाठबळ आमची संस्था कधीही विसरणार नाही.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, कराड अर्बन बँक नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवित असते. वाचनामुळे माणसाचे मन समृध्द बनते. त्यासाठी प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले पाहिजे. असे चांगले व दर्जेदार साहित्य वाचनाची संधी आपल्या भागातील वाचकांना कराड अर्बन बँकेने उपलब्ध करून दिली आहे.
विद्याधर गोखले म्हणाले की, कराड अर्बन बँकेने कराड शहर व परिसरामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने ‘गं्रथ तुमच्या दारी’ ही योजना स्वीकारली असून, जास्तीत जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमात गं्रथ पेटय़ा पुरस्कृत केलेल्या देणगीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.        

Story img Loader