कराड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोघा मोटारसायकल चोरटय़ांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशननजीक एक मोटारसायकल बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या संशयितांचे कोल्हापूर कनेक्शन उघड होत असून, कोल्हापुरातील त्यांचे भानगडबाज साथीदार कोण, याचा आता पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, कराड शहर पोलिसांचे एक पथक कोल्हापूरला तपासासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी रात्री कराडमध्ये मोटारसायकल चोरताना राजेश श्यामराव जाधव व सागर समेश जाधव या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून कराड पोलिसांनी दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. हे दोघेही सध्या कराड पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी चोरलेली एक मोटारसायकल गेल्या आठवडय़ात कोल्हापूर रेल्वे स्टेशनजवळ बेवारस स्थितीत सोडून दिली आहे. याबाबतची कबुली संशयितांनी दिल्याने कोल्हापूरमध्ये या संशयितांचे आणखी नेटवर्क असल्याचा कयास असून, त्यादृष्टीने पोलीस तपास जारी आहे. त्याचबरोबर हे दोघे चोरीची मोटारसायकल घेऊन कोल्हापूरला का गेले होते, कोल्हापूरमध्ये चोरलेल्या मोटारसायकली विक्री केल्या गेल्या आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचा उलघडा करण्याचे कराड पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

Story img Loader