* मतदारयादीचा प्रश्न कायम
* शहर वकील संघटना निवडणूक
नगर शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदासाठी शिवाजी कराळे, मुकुंद पाटील व नवनाथ गर्जे यांच्यामध्ये तिहेरी लढत होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी ५, सरचिटणीसपदासाठी २, महिला प्रतिनिधीसाठी ४ व कार्यकारिणीच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या दि. २२ ला ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान, संघटनेच्या आज झालेल्या सभेत शहराबाहेरील, इतर तालुक्यांतील मतदारांनी मतदान करु नये असे आवाहन करुन त्यांना मतदानापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निवडणूक अधिकारी अशोक बार्शीकर यांनी संघटनेचा सभासद असेल, तर शेवटच्या दिवसापर्यंत ५० रुपये शुल्क आकारुन मतदान करता येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे मतदारयादीचा मूळ प्रश्न कायम राहिला आहे. अजीव ४९७ व सर्वसाधारण १९८ असे एकूण ६९५ मतदार आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष व सचिवांनी मतदारयादी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. संघटनेच्या दि. ९ जानेवारीस झालेल्या सभेत मतदार यादी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी संदिप ढापसे यांच्यावर सोपवण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आजपर्यंत होती. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या शेखर दरंदले, किशोर गाडेकर व सुरेश ठोकळ यांनी उमेदवारी मागे घेतली. उपाध्यक्षपदासाठी अनिल घोडके यांनी माघार घेतल्याने रिंगणात बाळासाहेब पुंड, संतोष वाळुंज, चंद्रकांत निकम, विनोद गायकवाड व अनिल सरोदे असे ५ उमेदवार आहेत. सरचिटणीसपदासाठी सुनिल हरिश्चंद्रे व युवराज पाटील यांच्यात सरळ लढत होईल. या पदाचे दीपक कदम, युवराज पोटे, अजित वाडेकर, राजीव कातोरे या चौघांनी माघार घेतली. महिला प्रतिनिधीपदाच्या एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही, त्यामुळे श्रद्धा कुलकर्णी, पल्लवी जासूद, अनुराधा येवले व सायली गुप्ता या चौघी उमेदवार आहेत. कार्यकारिणीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार आहेत. वैभव आंधळे, अक्षय दांगट व संदिप जावळे यांनी माघार घेतली. त्यामुळे कृष्णा झावरे, संदिप काळे, सुजाता बोडखे, भाऊसाहेब घुले, कैलास कोतकर, संध्या ढवळे व पराग काळे असे उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी बार्शीकर यांनी केले.