मुंबई पोलीस दलातील महिला वाहतूक पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी आता कराटे आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नायगाव येथील हुतात्मा मैदानात या महिला वाहतूक पोलीस कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी महिला वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुजोर वाहनचालकांचा त्रास सहन करावा लागत आहे. या महिला निशस्त्र असल्याने त्या प्रतिकार करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या महिला पोलिसांना मानसिक आणि शारिरीकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) सुभाष निलेवाड यांनी सांगितले. मुंबईत साडेतीनशे महिला वाहतूक पोलीस असून शंभर जणींच्या तीन तुकडय़ा करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू रवी बिऱ्हाडे, चंद्रवधन गवई, मरिअप्पा शहापुरे, कल्पक धांदरे आदी या महिला पोलिसांना प्रशिक्षण देत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी दोन तास हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.