रयत शिक्षण संस्था उभारून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना कार्यान्वित करून श्रम व घामाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यामुळेच बहुजन समाजाचा उद्धार झाला, असे उद्गार प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी काढले.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संकुलात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, रावजी सखाराम वाणिज्य प्रशाला व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. येळेगावकर बोलत होते. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर हारून सय्यद, उद्योगपती अण्णासाहेब पाटील, पालिका शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके, अॅड. जयकुमार कस्तुरे आदी उपस्थित होते.
कर्मवीरांनी प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक संकटे झेलून रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. लक्ष्मीबाई पाटील यांनी आपले सोन्याचे दागिने रयत संस्थेच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी दिले. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात कायम राहील, असा विश्वास महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केला. प्रा. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रारंभी, सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रा. प्रशांत नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. सुरेश ढेरे यांनी आभार मानले. या वेळी काशीबाई पुजारी-ढेरे, जयश्री महाबोले, प्रा.मल्लिनाथ अंजुनगीकर, प्रा.बालाजी शेवाळे, प्रा.दिलीप कोने, डॉ.बाळासाहेब अवघडे, प्रा.अंबादास भासके आदींची उपस्थिती होती.

Story img Loader