कोल्हापुरातील उद्योजकांना कर्नाटकात उद्योग सुरू करण्यासाठी माहिती देण्यास आलेल्या कर्नाटकाच्या उद्योग सचिवास शिवसैनिकांनी गुरुवारी शर्टाला धरून बैठकीतून बाहेर काढले. अवघ्या ५ मिनिटांत ही बैठक उधळून लावण्यात आल्यने कर्नाटक शासनाच्या मनसुब्यावर पाणी फिरले.
कर्नाटक शासनाने उद्योजकांसाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत. महाराष्ट्रातील सवलतींपेक्षा या सवलती अधिक आकर्षक आहेत. त्यामुळे काही मराठी उद्योजक कर्नाटककडे जात आहे. कर्नाटक शासनाच्या उद्योगाची भूमिका पटवून देण्यासाठी तेथील उद्योग सचिव गुरुवारी कोल्हापुरात आले होते. रामभाई सामाणी सभागृहात उद्योजकांसोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीस गोकुळ शिरगाव उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अजय आजरी, बाबा बसा, बापूसाहेब चौगुले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
ही बैठक सुरू झाल्याचा सुगावा लागताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रा. विनय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक तेथे पोहचले. कर्नाटक शासन सीमा भागातील नागरिकांवर अन्याय करते आणि दुसरीकडे मराठी उद्योजकही तिकडे पळवून नेत आहे, अशी विचारणा करीत शिवसैनिकांनी उद्योग सचिवास धारेवर धरले. संतप्त शिवसैनिकानी सचिवाच्या शर्टाची कॉलर ओढतच बैठकीतून हाकलून लावले. अचानक घडलेल्या या प्रकाराने उद्योजक बिथरले होते.   

Story img Loader