पाच वेळा हिंदकेसरी किताब मिळवणारे, पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक, पद्मश्री कर्तारसिंग नगर शहरात व्यायामशाळा व कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहेत. तब्बल ३५ वर्षांनंतर त्यांचीच ही इच्छा प्रत्यक्षात येत आहे. त्यासाठीचा भूखंड सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. रावसाहेब अनभुले यांनी त्याचवेळी नगरमध्ये झालेल्या स्पर्धेत ‘भारत मल्ल सम्राट’ किताब जिंकल्याबद्दल कर्तारसिंग यांना बक्षीस म्हणून जाहीर केला होता. केडगावमध्ये पुणे लिंक रस्त्यावर हा भूखंड आहे.
देशभर प्रसिद्ध असलेले मल्ल कर्तारसिंग पुणे येथील कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरमार्गे जात असताना काही काळ शहरात थांबले होते. नगरमध्ये दि. ११ ते १३ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा होत आहे. पालकमंत्री बबनराव पाचपुते व कर्तारसिंग यांचे स्नेही निवृत्त जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. रवींद्र कवडे यांच्या आग्रहानुसार ते थांबले होते.

महाराष्ट्राने परंपरा राखावी
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सत्कारानंतर बोलताना कर्तारसिंग यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कुस्तीची मोठी परंपरा आहे, परंतु जागतिक कुस्तीत महाराष्ट्र मागे आहे तो केवळ मॅटवरील कुस्तीचे तंत्र आत्मसात न केल्याने आणखी मागे पडेल. हे तंत्र शिकले तरच ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राचे नाव होईल. मातीवरील व मॅटवरील कुस्तीमध्ये फरक आहे, मॅटवरील कुस्ती अधिक वेगवान आहे, कुस्तीची परंपरा महाराष्ट्राने कायम राखावी.

कर्तारसिंग यांनी कुस्ती स्पर्धा होणाऱ्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन, स्पर्धेच्या आयोजनासंबंधी काही सूचनाही केल्या. युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, डॉ. कवडे आदी उपस्थित होते.
नंतर कर्तारसिंग यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सत्कार केला. त्यावेळी कर्तारसिंग यांचा परिचय करुन देताना डॉ. कवडे यांनी भारत मल्ल सम्राट किताब जिंकल्याची व त्याबद्दल त्यावेळी मिळालेल्या भूखंडावर ते व्यायामशाळा व कुस्ती  केंद्र सुरु करत असल्याची माहिती दिली. कर्तारसिंग यांनीही त्यास दुजोरा दिला. डॉ. रावसाहेब अनभुलेही यावेळी उपस्थित होते.
भारत मल्ल सम्राट किताबासाठी नगर शहरात सन १९७७-७८ मध्ये लढत झाली होती. ही लढत जिंकणाऱ्यास अनभुले यांनी तालीम बांधण्यासाठी त्यावेळी भूखंड बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले होते. लढत कर्तारसिंग यांनी जिंकली. डॉ. अनभुले यांनी त्यांना लगेचच भूखंड देत असल्याचे जाहीर केले व दिलाही. परंतु नंतर या भूखंडाकडे व्यापामुळे कर्तारसिंग यांचे दुर्लक्ष झाले.
अनभुले यांनी तो तसाच राखीव ठेवला. आजच्या भेटीत कर्तारसिंग यांनी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच या भूखंडावर व्यायामशाळा सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे अनभुले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader