कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीनगरीत येणाऱ्या भाविकभक्तांना सेवासुविधा पुरवताना सेवाभाव म्हणून अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बजावली पाहिजे, असे महसूल विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी आढावा बैठकीत सांगितले.
येथील विश्रामधाम येथे कार्तिकी यात्रा आढावा बैठक तसेच विकासकामे यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, आमदार भारत भालके, अतिरिक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक तुषार होशी, प्रांत बेलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, तहसीलदार सचिन डोंगरे नगराध्यक्षा भालेराव व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
ऐन वारीच्या तोंडावर डेंग्यूच्या साथीचा फैलाव हा सर्वत्र जाणवत आहे. वारी संपल्यानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आरोग्य खाते, प्रशासन यांनी वाढ न होण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने शहर व परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे असे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
पंढरपूर शहरात जी कामे चालू आहेत त्याची पाहणी देशमुख यांनी केली. पंढरपूर शहरातील बसस्थानक व काही ठिकाणच्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. त्या ठिकाणची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
शहरातील रस्त्याची कामे आषाढी यात्रा २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. जी कामे २० नोव्हेंबर व २७ नोव्हेंबरला पूर्ण करण्यात येणार आहेत ती कामे कासवगतीने चालू आहेत, त्यामुळे बसस्थानक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ब्लड बँक हे रस्ते होणार का, हा खरा प्रश्न आहे.
शहरात एका वर्षांत चार हजार शौचालये बांधून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी जोरात प्रयत्न चालू आहेत असे सांगून आयुक्त देशमुख यांनी सर्वाना आवाहन केले की वारीच्या निमित्ताने येणाऱ्या सर्वाना उत्तम सुविधा देऊन सहकार्य करावे व यात्रा सुरळीत पार पाडावी असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा