अजमल कसाबला सरकारने एवढय़ा दिवस पोसलाच का? ज्याने कोणाचे पोर, कोणाचा पती, कोणाकोणाला मारले. संसार बसवले त्याला सरकारने एवढे दिवस पोसायलाच नको होते, हे उद्गार आहे. हुतात्मा पोलीस शिपाई जयवंत हणमंत दुधे यांची आई शकुंतला दुधे यांचे.
मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात वाई तालुक्यातील जयवंत दुधे-कडेगाव, बापूराव दुर्गुडे-दुर्गुडेवाडी, भुईज, अंबादास पवार-कवठे व जावळी तालुक्यातील तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले होते. आज सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी या घटनेतील अतिरेकी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली. याची माहिती या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. सकाळी ११ वाजता वाईतील पत्रकारांनी याची माहिती त्यांना दिली.
ज्याने आमच्या रक्ताचा अंश नेला त्याची माहिती ठेवण्याचे कारणच नाही. नोव्हेंबर महिना आला की आमच्या घरी अतिशय दु:खाचा डोंगर उभा राहतो.
खूप मानसिक त्रासाचा हा महिना असतो. असे सांगताना शकुंतला दुधेंना अश्रू आवरले नाहीत. अशा प्रकारची अतिरेकी कृत्ये करणाऱ्यांना लगेचच फाशी द्यायला हवे. देशात अनेक अनाथ, निराधार लोक राहतात. त्याच्यावर शासन खर्च करू शकत नाही. पण अतिरेकी सांभाळण्यासाठी केवढा मोठा खर्च शासन करते. यावर एकच उपाय म्हणजे यांना लगेचच फाशी द्यावी. या घटनेसंदर्भातील बातम्या आम्ही कधी वाचत नाही व ऐकतही नाही. एवढी घृणा त्यांच्या मनात या घटनेची घर करून राहिली आहे. सरकारने मदत दिली आहे, असेही या नातेवाइकांनी सांगितले.   

Story img Loader