कासारवाडी येथील सराफास ठार मारण्याचा प्रयत्न करून तब्बल ९० लाखाचा माल लुटणाऱ्या आरोपींच्या टोळीतील दोनजणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आठ दिवसात आरोपींचा शोध लावल्याबद्दल गुन्हे शाखेच्या युनिट तीनला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
कासारवाडीत १० डिसेंबरला रमेशकुमार ज्वेलर्स या दुकानात नरेंद्र चंपालाल जैन यांच्यावर धारदार शस्त्रांद्वारे हल्ला करून दुकानातील माल चोरून नेण्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रावणभारती केवाभारती गोस्वामी (वय-२१, िपपरीगाव) व नरेशगिरी काळुगिरी गोस्वामी (वय-२०, िपपरी गाव, दोघेही मूळचे राहणार, जि. बनासकाटा, गुजरात) यांना गुजरात येथून अटक करण्यात आली. तर, जनक नरपतसिंग दरबार, फिरोज व कल्पेश हे तीन आरोपी फरार आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे आदी उपस्थित होते.
आरोपी श्रावणभारती व नरेशगिरी काळेवाडीत एका सराफाकडे कामाला होते. दोघांचेही नरेंद्र जैन यांच्याकडे येणे-जाणे होते. िपपरीत एका फ्लॅटवर जैन यांना ठार मारून दुकान लुटण्याचा कट आरोपींनी रचला. त्यासाठी पुण्यातून शस्त्रे, दोरी, फेवीक्विक, रुमाल आदी साहित्य खरेदी केले. दोन दिवस दुकानाची टेहळणी केली. घटनेच्या दिवशी दुपारी खरेदीच्या बहाण्याने ते दुकानात शिरले. जैन यांच्या गळ्यावर व हातावर वार करून कपाटातील ९० लाख रुपयांचा माल चोरून त्यांनी गुजरातला पळ काढला. आरोपींची माहिती मिळाल्यानंतर तांदळे यांच्या पथकाने अहमदाबाद येथून दोन आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून दीड किलो सोने व गुन्ह्य़ात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
औद्योगिकीकरणामुळेच गुन्हेगारी वाढली- सोळुंके
िपपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी हे पोलिसांचे अपयश नाही. तर, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे विधान अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी यावेळी केले. शहरात कंपन्या जास्त आहेत. त्यासाठी मोठा वर्ग बाहेरून येतो. औद्योगिकीकरण वाढते तसे गुन्हे वाढतात. औद्योगिकीकरण रोखता येत नसल्याने त्याअनुषंगाने होणारे गुन्हेही रोखता येणार नाही, ते वाढत राहणार, असे ते म्हणाले. कासारवाडीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणाचा समांतर तपास सुरू असल्याचे ते म्हणाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा