पुरामुळे घरदार वाहून गेलेल्या जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांना आता आणखी एका आव्हानाला तोंड द्यायचे आहे. ते आहे, उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या जीवघेण्या थंडीचे. घरातील सर्व चीजवस्तू वाहून गेलेल्या जम्मू-काश्मीरवासियांकडे पुरेसे कपडेही उरलेले नाहीत. त्यातून हाडे गोठवणाऱ्या थंडीत पांघारायला गरम कपडे कुठून येणार? काश्मीरींची ही अडचण ओळखून त्यांच्याकरिता एक हजार ब्लँकेट जमा करण्याचा संकल्प मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने सोडला आहे.
मुंबईतील व्यवसायाने डॉक्टर असलेले विवेक कोरडे मदतीच्या उद्देशाने काश्मीरला जाऊन आले तेव्हा पुरात वाहून गेलेल्या काश्मीरवासियांच्या या आव्हानाची जाणीव त्यांना झाली. तेथील लोकांना काही ना काही मदत करण्यासाठी डॉ. कोरडे आपल्याकडील होती नव्हती तितकी औषधे घेऊन तडक काश्मीरला पोहोचले. तिथे बंगालमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी लोकांवर उपचार केले. ‘पुरानंतर विविध साथीचे, संसर्गजन्य आजारांपेक्षाही कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे तेथील लोक त्रस्त असल्याचे आपल्याला आढळून आले,’ असे डॉ. कोरडे यांनी सांगितले. डॉ. कोरडे तेथे जवळपास १५ दिवस होते. त्यांना जाणवले की काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या थंडीचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आता येथील लोकांना पेलावे लागणार आहे.
या लोकांना आता गरम कपडय़ांची नितांत आवश्यकता आहे. ही परिस्थिती त्यांनी येथील सवरेदय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मंडळाने सुमारे १००० ब्लँकेट जमा करण्याचा संकल्प सोडला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष जयंत दिवाण यांनी सांगितले. या करिता सुमारे १० लाख रुपयांच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. इच्छुकांनी ‘मुंबई सवरेदय मंडळा’च्या नावाने धनादेश काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दात्यांना ८०-ग या कलमाचा फायदा घेऊन आयकरात सवलतही घेता येईल. मंडळाचा पत्ता – मुंबई सवरेदय मंडळ, २९९ ताडदेव रोड, नाना चौक, मुंबई-७
डॉ. कोरडे यांना काश्मीरमध्ये मदत करणाऱ्यांमध्ये काश्मीरमधील एक अ‍ॅडव्होकेट तरुणी, आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष या संस्थेचा कार्यकर्ता, स्थानिक पत्रकार यांच्याशिवाय स्वयंस्फुर्तीने काम करणारे काश्मीरी तरूण होते. या तरूणांनाही ‘काश्मीर-मुंबई युथ एक्स्चेंज’ या उपक्रमाच्या माध्यमातून सवरेदय मंडळाच्या कामाशी जोडण्याचा विचार आहे.

Story img Loader