कला अकादमी-गोवातर्फे २३ ते २५ जुलै या कालावधीत पणजी येथील अकादमीच्या संकुलात ‘काव्य होत्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या काव्य संमेलनात विविध भाषक कवी सहभागी होणार असून कवितेचा हा उत्सव सलग तीन दिवस चालणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष आणि कवी व आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. २३ जुलै रोजी दुपारी बारा वाजता काव्य होत्रास सुरुवात होणार आहे. सुमारे ३०० नामवंत आणि नवोदित कवी यात सहभागी होणार आहेत. अकादमीच्या संकुलात पाच व्यासपीठांवर हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगून वाघ म्हणाले, तीन दिवसांच्या या कविता उत्सवात समकालीन कवितेच्या विविध रूपांचे दर्शन घडणार आहे, शाहिरी, पहाडी, गेय, मुक्तछंदात्मक, गझल, प्रादेशिक असे वेगवेगळे काव्यप्रकारही येथे सादर होणार आहेत. कवींना आपल्या स्वरचित कवितेसह यात सहभागी होता येणार आहे. तपशिलवार माहितीवजा आवेदनपत्र http://www.kalaacademygoa.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. ‘काव्य होत्र’मधील कवींची निवड अकादमीतर्फे केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी कला अकादमीच्या कार्यक्रम आणि विकास विभागात ०८३२-२४२०४५२/५३ या क्रमांकावरकिंवा कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तगुरू आमोणकर यांच्याशी ०९८२२१२७५३२ या क्रमांकावर सकाळी १० ते दुपारी १ किंवा दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जावी, यासाठी या संस्थांच्या प्रतिनिधींनाही पाचारण करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा