पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक निर्माण करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पत्र जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. याच संदर्भातील पत्र पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनाही प्राप्त झाले आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणी दूर करून हे स्मारक त्वरित निर्माण करावे, अशी मागणी कवाडे यांनी केली आहे.
सुमारे २० वषार्र्पासून प्रलंबित शताब्दी स्मारकासंदर्भात भूखंडाच्या तांत्रिक अडचणीबाबत खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी १२ एप्रिल २०१३ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, तसेच याप्रकरणी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना माहिती विचारली आहे. पटवर्धन मैदानाची एकूण १३.५६ एकर जागा ही बहुउद्देशीय स्टेडियमच्या उपयोगाकरिता दिलेली आहे. संबंधित जागेच्या लिजची मुदत सन १९७७ मध्येच संपली आहे.
या जागेच्या भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे वारंवार विनंती केली. परंतु अजूनपर्यंत लीज नूतनीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रस्तुत भूखंड शासनाच्या मालकीचा असून शासनाने महापालिकेला ना हरकत प्राणपत्र दिल्यास शताब्दी भवन निर्मितीचा मार्ग मोकळा होईल, अशी आशाही प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासकीय दिरंगाई व अनास्था यामुळे पटवर्धन मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकासाठी करण्यात आलेला प्रदीर्घ विलंब अत्यंत दुर्दैवी आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन प्रलंबित मागणी पूर्ण करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रा. कवाडे यांनी दिला आहे.