यावर्षीचे कावळे-देशपांडे स्मृती पुरस्कार उषा पानसे व चंद्रकला गिरडे या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आले आहे. विदर्भ साहित्य संघ व कावळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां अरुणा सबाने यांच्या हस्ते तिगावच्या उषा ईश्वरराव पानसे यांना इंदिराबाई कावळे स्मृती पुरस्कार, तसेच मोर्चापूर येथील चंद्रकला केशवराव गिरडे यांना विमलताई देशपांडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अंगमेहनतीचे काम करीत असतानाच चेतना विकास या संस्थेच्या संपर्कात आल्याने सामाजिक कार्याची प्रेरणा प्राप्त झालेल्या उषा पानसे यांनी गावात महिलांचे संघटन स्थापन करून दारूबंदी अभियान, बचत गट, जातिभेद निर्मूलन, मजुरी करणाऱ्या स्त्रियांच्या बालकांसाठी पाळणाघर, ग्रामस्वच्छता, आरोग्यसेवा, तसेच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक उपक्रम राबविले, तर चंद्रकला गिरडे यांनी स्वत: कृषी व्यवसाय स्वीकारून आपल्या कुटूंबाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण केले. त्यांनी स्वास्थ्यरक्षक बनून आरोग्य शिबिरांच्या आयोजनासोबतच किशोरी योजना, महिला बचत गट व शेतकरी बचत गट स्थापना, गृहउद्योगाला चालना, तंटामुक्ती अभियान, अंगणवाडी उपक्रम, तसेच ग्रामपंचायतीच्या उपक्रमांमध्ये महत्वाचे योगदान दिले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीता कावळे, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, केंद्रीय शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, प्रा.जयंत मादुस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम आणि सन्मानपत्र, असे स्वरूप असलेले हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी चळवळीतील कार्यकर्त्यां रजिता महाजन व सुलभा काणे, तसेच विलास देशपांडे, सुरेश जोई, सविता मेहता, अरुणा सबाने यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुमनताई बंग, डॉ. उल्हास जाजू, प्राचार्य श्रीधर महाजन, प्रा.विजय व्यास, वि.सा.संघाच्या शाखा सचिव डॉ. स्मिता वानखेडे, कार्यक्रम प्रमुख योगेंद्र कावळे, प्रा. स्मिता कावळे, डॉ.वीणा देव, दीप्ती बगे, मनीष खडतकर, अनिल दाउतखानी, अवंतिका ढुमणे, कोमल कोल्हे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

Story img Loader