कामगारांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी कोल्हापुरात सर्व कामगार कृती समितीच्या वतीने कायदेभंग आंदोलन करण्यात आले. दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको करणाऱ्या एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका करण्यात आली. आंदोलनात घर कामगार महिला मोलकरीण संघटनेच्या सदस्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात होती.
देशातील कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्व संघटनांनी देशपातळीवर आंदोलन हाती घेतले आहे. याअंतर्गत १८ व १९ डिसेंबर रोजी कायदेभंग करण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी कोल्हापुरात सर्व कामगार कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दाभोळकर कॉर्नर येथे कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाल्याने चारही बाजूंची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. जमावबंदी आदेश असल्याने आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. यानंतर सर्वाना शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या दारातच कामगार नेते व कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. कॉ. दिलीप पवार, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, सुशीला यादव, प्रा. सुभाष जाधव, जयंत देशपांडे आदींची भाषणे झाली. आंदोलनात आयटक, सिटू, भारतीय मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना, घर कामगार संघटना आदी विविध संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.

Story img Loader