गुणवत्तेच्या अंमलबजावणीसाठी येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित केबीपी तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अमेरिकन क्वालिटी असेसर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुढील तीन वर्षांसाठी आयएसओ ९००१-२००८ हे प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारी ही जिल्ह्य़ातील पहिलीच शैक्षणिक संस्था आहे, अशी माहिती प्राचार्य आर. ए. कापगते यांनी दिली.
कापगते यांनी सांगितले, कोणत्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेला दर्जेदार बाबी संबंधितांना देण्यासाठी स्वत: काही बाबींची आचारसंहिता घालून घेणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थी हे जागतिक आव्हाने पेलण्याइतपत सक्षम व्हावे ही दूरदृष्टीने ठेऊन संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांनी पॉलिटेक्निकमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यामुळेत संस्थेला हे प्रमाणपत्र मिळाले. त्यासाठी संस्थेतील आयएसओ प्रतिनिधी प्रा. डी. बी. बोरसे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. संस्थेच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी अभिनंदन केले.