शासनाचा नगरविकास विभाग तसेच महापालिकेची सर्वसाधारण सभा यांची कोणतीही परवानगी न घेता साडेचार वर्षांपूर्वी लाच घेताना अटक झालेले कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी शासनाच्या एका अध्यादेशाचा आधार घेऊन हजर करून घेतल्याने शासन पातळीवर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन या प्रकरणी नियमबाह्य़ काम करणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. हे प्रकरण चिघळू नये तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चेला येऊ नये म्हणून महापालिकेतील काही अधिकारी विशेष खबरदारी घेत असल्याची चर्चा आहे. कल्याणमधील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी, सुनील जोशी यांची नियमबाह्य़ केलेली नेमणूक तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जोशींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बेहिशेबी मालमत्ता, मद्याची साठवणूक, प्राप्तिकर विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून स्वतंत्र चार ते पाच दावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. या दाव्यांचे कोणतेही निकाल लागले नसताना जोशी सेवेत आले कसे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. निलंबन आढावा समितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने जोशी यांच्या महापालिकेतील पुनर्नियुक्तीला विरोध केला होता. असे असताना सुनील जोशी यांना रामनाथ सोनवणे यांनी नियमबाह्य़पणे सेवेत दाखल करून घेतले आहे, असे आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. भाजपचा जोशी यांच्या नियुक्तीला पूर्ण विरोध असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले आहे.