कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे गेल्या वर्षी विशेष अनुशेष भरण्यासाठी १६८ कर्मचाऱ्यांची ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून ऑनलाइन नोकरभरतीसाठी अर्ज मागविले होते. या भरतीप्रक्रियेच्या वेळी उमेदवारांची पात्रता, अपात्रता याची शहानिशा न करता ही भरती करण्यात आल्याची तक्रार ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाकडे करण्यात आली आहे. या नोकरभरती प्रक्रियेत सायबर क्राईम घडला असल्याचा अहवाल सायबर क्राईम विभागाने वरिष्ठांना देऊनही पोलीस याविषयी चौकशी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिका प्रशासनाने केलेल्या वर्ग एक ते तीन पदांवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भरतीत अनियमितता असल्याची चाहूल लागल्याने पालिकेतील ११२ नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत या नोकरभरतीच्या विषयाला मान्यता दिलेली नाही. तीन वेळा हा विषय सर्वसाधारण सभेने फेटाळून लावला आहे. या नोकरभरतीमधील अनियमिततेची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप कर्णिक यांच्याकडे केली होती. या प्रकरणात सायबर क्राईम असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही तक्रार सायबर क्राईम विभागाकडे सुपूर्द केली. या विभागाने काही दिवस चौकशी करून वरिष्ठांना या नोकरभरती प्रक्रियेत सायबर क्राईम असल्याचा अहवाल पाठविला आहे. माहिती अधिकारांतर्गत ही सर्व माहिती उपलब्ध झाली आहे.
एक वर्ष उलटून गेले तरी सायबर क्राईम विभाग ही नोकरी भरती करणाऱ्या पालिका प्रशासन, एमकेसीएलबाबत कोणतेही चौकशीचे पाऊल उचलत नसल्याने तक्रारदार कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सायबर विभागाच्या या टाळाटाळीची तक्रार कांबळे यांनी ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक मल्लेश शेट्टी, बुधाराम सरनोबत यांनी या नोकरभरतीत अर्थपूर्ण व्यवहार झाली असून ही नोकरभरती बेकायदा असल्याची तक्रार यापूर्वीच आयुक्तांकडे केली आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांचा या नोकरभरतीला विरोध आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने ही भरती करून आपलेच ‘दुकान’ चालविणारे अधिकारी मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.
दरम्यान, पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरप्रकारात पालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे पोलीस, नोकरभरतीतही पालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने पालिका आणि पोलीस यांच्या या नवजात नातेसंबंधांचा बोलविता धनी कोण आहे याविषयी पालिकेत खमंग चर्चा सुरू आहे. एक उच्चपदस्थ पालिका अधिकारी आपल्यावरील बलामत टाळण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करून या सर्व खेळी खेळत असल्याची पालिकेत चर्चा सुरू आहे.

Story img Loader