कोणत्याही पालिकेत कधी होत नसतील असे उद्योग सध्या कल्याण-डोंबिवली पालिकेत फोफावले आहेत. त्याची फळे संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य वेळी भोगावी लागतात. राजेंद्र ठोके हे कर्मचारी गेली २३ वर्षे पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात बाजार परवाना, शुल्क वसुली विभागात कार्यरत आहेत. मुख्य बाजार परवाना अधिकारी गणेश बोराडे निलंबित झाल्याने ठोके यांच्याकडे कल्याणचे काही पदभार सोपविण्यात आले आहेत.
पालिकेचे बाजार शुल्क वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे काम बाजार शुल्क वसुली विभागाकडे असते. हे शुल्क शहराच्या अन्य भागांतील फेरीवाल्यांकडून वसूल होत नाही. म्हणून ना फेरीवाला विभागात रेल्वे स्थानक भागात बसलेल्या फेरीवाल्यांना सकाळी आणि संध्याकाळी एक ते दोन तास व्यवसाय करण्याची मुभा देऊन त्यांच्याकडून प्रती फेरीवाला २० रुपये वसूल केले जातात. ही वसुली करताना कर्मचाऱ्याला पाच ते सहा हजार वसुलीचा लक्ष्यांक दिला जातो. हा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी व साहेबाचे ‘लक्ष्मी पूजन’ करण्यासाठी फेरीवाल्याकडून २० रुपये वसुली केली तरी प्रत्यक्ष फेरीवाल्याला देण्यात येणाऱ्या पावतीवर ५ ते १० रुपये वसुली लिहिली जाते. उर्वरित १० रुपये वसुली कर्मचाऱ्याच्या खिशात आणि तेथून ती साहेबाच्या खिशात अशी व्यवस्था वर्षांनुवर्षे या विभागात असल्याचे सांगण्यात येते.
कल्याणमध्ये कत्तलखान्यासाठी अनेक चोरटी जनावरे रात्रीच्या वेळेत आणली जातात. त्यामध्ये काही लहान वासरेही असतात. जनावरे कत्तल करण्यापूर्वी बाजार परवाना विभागाची परवानगी आवश्यक असते.
ही परवानगी न घेताच कत्तलखान्यात भाकड जनावरे म्हणून चोरटी जनावरे लोटली जातात. पावत्या न फाडता होणाऱ्या या व्यवहारात मोठय़ा रकमेची मलई कर्मचाऱ्यांना मिळते, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य विभागांत जाण्यासाठी मदत करताना काही व्यवहार केला जातो. या सगळ्या व्यवहारांत वरिष्ठांपासून ते कनिष्ठापर्यंत सगळेच सहभागी असल्याने एक कर्मचारी एकाच जागी २३ वर्षे बसू शकतो. त्याच्याविरुद्ध एकही नगरसेवक आवाज उठवीत नाही, कारण नगरसेवकांचे हळदीकुंकू कार्यक्रम यथासांग पार पाडण्यासाठी हे सरंजामदार कर्मचारी हातभार लावतात. हे कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात तेव्हा पालिकेची बदनामी होते हे मात्र प्रशासन सोयीस्करपणे विसरते. प्रभागातील सफाई कामगारांना बाजार शुल्क वसूल करण्यासाठी वापरायचे. हे सफाई कामगार साहेबांच्या आशीर्वादाने झाडूला हात न लावता फक्त साहेबाचे आदेश पाळणार. सफाई कामगाराचे सर्व भत्ते घेणार. निवृत्ती जवळ आली की पुन्हा सफाई कामगाराचे सर्व लाभ घेण्यासाठी हे कामगार पुढाकार घेणार. हे सर्व गैरउद्योग या सरंजामदार अधिकाऱ्यांच्या सोयीने पालिकेत सुरू आहेत.भाजीमंडयांमध्ये फेरीवाल्यांचे सामान ठेवण्याच्या बदल्यातील वसुली, बेकायदा पार्लर सुरू करण्यास परवानगी हे सगळे उद्योग या बाजार परवाना उद्योगात सुरू असल्याचे सांगण्यात येते. राजेंद्र ठोके यांनी मात्र यापूर्वीच आपण प्रशासन देईल त्या ठिकाणी काम करण्यास तयार आहोत. आपण वेळोवेळी बदलीची मागणी केली आहे. एकाच जागी काम करण्याची आपणास हौस नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Story img Loader